Breaking News

जिल्हा प्रशासनाने कोरोना निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे निर्देश

Chief Secretary Sitaram Kunte directed the district administration to implement the Corona restrictions effectively

        मुंबई - : राज्यातील काही जिल्ह्यांचा कोरोना रुग्ण संख्येचा पॉझिटिव्हीटी दर जास्त असून जिल्हा प्रशासनाने कोरोना निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करतानाच चाचण्यांची संख्या वाढवावी. कंटेन्मेंट झोनची उपाययोजना प्रत्यक्षात आणावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करताना अतिरेक होऊ देऊ नका, अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी येथे दिल्या.

        राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव जिल्हानिहाय दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याशी संवाद साधून आढावा घेत आहेत.  त्यांनी पुणे आणि नाशिक विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आढावा घेतला. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी उपस्थित होते.

        मुख्य सचिव श्री.कुंटे यावेळी म्हणाले, काही जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचा दर जास्त असून तो कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकट सहवासितांची तपासणी करण्याचे प्रमाण वाढवावे. घरोघरी जाऊन सर्व्हे करावा. त्याचबरोबर दैनंदिन चाचण्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी जिल्ह्यांमध्ये असलेल्या सुविधांचे अद्ययावतीकरण करुन घ्यावे.

        कंटेन्मेंट झोनसाठी असलेल्या उपाययोजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ कार्यवाही सुरु करावी. शहरी भागात महापालिका आणि पोलीस प्रशासनाने समन्वयाने काम करुन लोकांना कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी आवाहन करतानाच नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी. ज्यांना गृह अलगीकरण करण्यात आले आहे त्यांचा यंत्रणेने दररोज आढावा घेऊन आरोग्य विषयक पाठपुरावा करावा.

        सध्या राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु असून त्याला गती द्यावी. ज्या जिल्ह्यांचा पॉझिटिव्हीटी दर जास्त आहे तेथे लसीकरण वाढविण्याकरिता अतिरिक्त साठा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर लसीकरण मोहीम राबविण्यात यावी. त्याठिकाणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियमित भेटी देऊन लसीकरणाचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले.

        कोरोना प्रतिबंध नियमांचे प्रभावीपणे पालन करण्यासाठी ‘मी जबाबदार’ ही जाणीवजागृतीची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी. विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देशही मुख्य सचिवांनी यावेळी दिले. कोरोना प्रतिबंधाबाबत जिल्हा प्रशासनाला गेल्या वर्षभरापासूनचा अनुभव असून कोरोनाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मैदानात उतरुन उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहनही मुख्य सचिवांनी केले.

No comments