Breaking News

नागरी अंगणवाडी मदतनीसांना न्याय देण्यासाठी पदोन्नतीच्या अटी, शर्तीमध्ये सुधारणा करण्याचा विचार – महिला व बालविकास मंत्री

Consideration to amend the terms and conditions of promotion to give justice to the civic anganwadi helpers

        मुंबई -: एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत नागरी क्षेत्रातील अंगणवाडी मदतनीसांना न्याय देण्यासाठी पदोन्नतीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने अटी व शर्तींची योग्य पडताळणी करुन सुधारणेचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

        एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत मंत्रालयीन दालनात बैठक झाली. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त श्रीमती इंद्रा मालो आदी अधिकारी उपस्थित होते.

        नगरपंचायतप्रमाणेच ‘क’ आणि ‘ड’ दर्जाच्या महानगरपालिकांच्या क्षेत्रातील अंगणवाडी मदतनीसांना अंगणवाडी सेविकेच्या पदावर पदोन्नतीने नियुक्ती देताना विचारात घेण्यात यावे; तसेच काही बालविकास प्रकल्पांचे क्षेत्र विस्तारीत असल्याने संपूर्ण नगरपालिका आणि ‘क’ व ‘ड’ दर्जाचे महानगरपालिका क्षेत्र पदोन्नतीसाठी विचारात घ्यावे लागेल. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव शासनास सादर करावा, असे निर्देश ॲड.ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत दिले.

        यापूर्वी नगरपालिका आणि ‘क’ व ‘ड’ दर्जाच्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या प्रभागात अंगणवाडी सेविकेचे रिक्त पद असेल तेथील मदतनीसला पदोन्नती देण्यात येत होती. परंतु, एखाद्या प्रभागात अंगणवाडी मदतनीसाची सेवा अन्य प्रभागातील अंगणवाडी मदतनीस पेक्षा जास्त झाली असली तरी देखील केवळ तिच्या प्रभागामध्ये अंगणवाडी सेविकेची जागा रिक्त नसल्यास तिला पदोन्नतीची संधी मिळत नाही. मात्र अन्य प्रभागातील अंगणवाडी मदतनीसाला तिची सेवा कमी वर्षाची असली तरी तिला तेथील सेविकेचे पद रिक्त असल्यास पदोन्नतीची संधी मिळते, ही विसंगती दूर करण्याच्या दृष्टीने मंत्री ॲड.ठाकूर यांनी तात्काळ निर्देश दिले.

No comments