कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांच्या निवासस्थानाची व्यवस्था करण्यासाठी शासनाचा पुढाकार
मुंबई - : मानवतेच्या दृष्टीकोनातून कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांची व काळजीवाहू व्यक्तींच्या निवासाची सोय करता यावी या दृष्टीने शासनाने पहिल्यांदाच म्हाडाच्या १८८ उपलब्ध असलेल्या गाळ्यांपैकी १०० गाळे टाटा मेमोरियल रूग्णालयाला देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेवून १०० गाळे टाटा मेमोरियल रूग्णालयाला हस्तांतरित केले असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गृहनिर्माण विभाग (म्हाडा) व टाटा मेमोरियल रुग्णालय, परळ यांच्या संयुक्त विद्यमाने गृहनिर्माण मंत्री श्री.आव्हाड यांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी म्हाडा उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे, टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक डॉक्टर शैलेश श्रीखंडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
टाटा मेमोरियल रूग्णालय हे कर्करोग रूग्णांचे उपचार करण्यासाठी नावाजलेले असून या उपचारासाठी फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून कॅन्सरग्रस्त रुग्ण येत असतात. सोबतच त्यांचे नातेवाईक व काळजीवाहू व्यक्ती येतात. परंतू त्यांच्या राहण्याची व्यवस्था नसल्याने किंवा खासगी निवासस्थानाची सोय असलेले ठिकाण आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने बरेचदा नातेवाईकांना फुटपाथवर रहावे लागत असल्याने त्यांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी शासनाने रूग्णालयाशेजारी असलेल्या परळ शिवडी विभाग, महादेव पालव मार्ग, डॉ. बी. ए. रोड, करी रोड मुंबई येथील हाजी कासम चाळ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मालमत्तेच्या समूह पुनर्विकास योजनेमधून मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळास एकू्ण १८८ गाळे प्राप्त झाले आहेत. यापैकी सद्य:स्थितीत ३०० चौरस फुट असलेले १०० गाळे टाटा मेमोरियल रूग्णालयास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. असे श्री.आव्हाड यांनी सांगितले.
गाळ्यांच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी टाटा मेमोरियल रूग्णालयाला देण्यात आली असून गृहनिर्माण विभाग व टाटा मेमोरियल रूग्णालय यांच्यामध्ये लवकरच कारारनामा करण्यात येणार आहे. व उर्वरित गाळे लवकरच टाटा मेमोरियल रूग्णालयाला सुपुर्द करण्यात येईल. असेही गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
No comments