Breaking News

होळी, धूलिवंदन व रंगपंचमी सण साधेपणाने साजरा करण्याच्या शासनाच्या सूचना

Government's instructions to celebrate Holi, Dhulivandan and Rangpanchami with simplicity

        मुंबई : कोविड-१९ च्या अनुषंगाने यावर्षी सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच मोठ्या स्वरुपातील कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने एकत्रित येऊन उत्सव साजरा करणे योग्य होणार नाही. त्यामुळे यावर्षी ‘होळी, धूलिवंदन व रंगपंचमीचा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन शासनाने केले आहे.

        या संदर्भात शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. होळी/शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी २८ मार्च २०२१ रोजी होळीचा सण आहे. कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणत्याही प्रकारे गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करुन हा सण साधेपणाने साजरा करावा. रंगपंचमी हे सण साजरे करताना दरवर्षी या सणानिमित्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येत असते. परंतू कोविड-१९ चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धूलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत.

        होळी/शिमगा सणाच्या निमित्ताने खास करुन कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतू यावर्षी पालखी घरोघरी न नेता मंदीरातच दर्शनाची व्यवस्था होईल याकरिता स्थानिक प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तसेच त्याठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सींगचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घेण्यात यावी. तसेच होळी व धुलिवंदन या उत्सवाच्या ठिकाणी मोठ्या स्वरुपाचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत.

        कोविड-१९ च्या विषाणूंच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही गृहविभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

No comments