लोकनेत्यांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा मनस्वी आंनद - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर
शुभारंभाचे ऑनलाइन साक्षिदार व्हा - खा. रणजितसिंह
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सेवा शुभारंभाचा कार्यक्रम हा अॉनलाईन होणार आहे. फलटण पुणे या रेल्वे शुभारंभाच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षिदार होण्यासाठी www.youtube.com/railminindia या लिंकद्वारे फलटणकरांनी मोठ्या संखेने ऑनलाइन उपस्थित रहावे असे आवाहन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण: फलटणकरांना बहुप्रतिक्षेची असलेल्या फलटण ते पुणे या नियमित डेमू रेल्वेसेवेचा शुभारंभ उद्या केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते ऑनलाइन होणार आहे. लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्या निधनाच्या वर्षपुर्तीपुर्वीच ही रेल्वे सेवा सुरु होत असल्याचा व त्यांचे स्वप्न पुर्ण होत असल्याचा मला, माझ्या कुटूंबियांना व फलटणकरांना मनस्वी आनंद होत असल्याचे प्रतिपादन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
ऑनलाइन पध्दतीने होणाऱ्या या उदघाटन सोहळ्यास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार शरद पवार, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार वंदना चव्हाण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार सुनील कांबळे व फलटणच्या नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे आदींची ऑनलाइन उपस्थिती राहणार आहे.
मंगळवार दि. ३० मार्च रोजी फलटण रेल्वे स्थानकावरुन उदघाटनानिमित्त विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. या गाडीचे उदघाटन केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ऑनलाइन होणार आहे. सदर गाडीस सुरवडी, लोणंद, नीरा, जेजुरी, सासवड रोड या स्थानकांवर थांबा असणार आहे.
अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी या रेल्वेची नियमित सेवा बुधवार दि. ३१ मार्चपासून सुरू होईल. गाडी क्रमांक ०१४३६ पुणे येथून ५ वाजून ५० मिनिटांनी सुटेल व फलटण येथे साडे नऊ वाजता पोहोचेल व परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१४३६ फलटण येथून संध्याकाळी सहा वाजता सुटेल व पुणे येथे साडे नऊ वाजता पोहोचेल. गाडी सुरवडी, लोणंद, नीरा, जेजुरी व सासवड रोड स्टेशनवर थांबेल. रविवारी ही सेवा बंद राहील.
नियमित रेल्वे प्रवासासाठी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने स्थानिक प्रशासकीय स्तरावर अत्यावश्यक सेवेतील संबंधित लोकांना फलटणचे प्रांत अधिकारी यांच्याकडून क्यूआर कोड आधारित ओळखपत्रे / पास दिले जातील व पुणे पोलिस आयुक्त यांना नोडल ऑफिसर म्हणून नेमण्यात आले आहे जे संपूर्ण प्रक्रिया पुर्ण करून क्यूआर कोड आधारित ओळखपत्रे / पास जारी करतील. प्रांत अधिकारी फलटण व पोलीस आयुक्त पुणे अत्यावश्यक सेवेतील लोकांची ओळख पटवून त्यांना ओळख पत्र जारी करतील ही ओळखपत्रे क्यू आर कोड आधारित/ पास आधारित असतील.
अत्यावश्यक सेवेतील लोक स्टेशन वर क्यू आर कोड आधारित ओळखपत्र/पास दाखवून तिकीट खरेदी करून प्रवास करू शकतात असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.फलटण तहसील कार्यालयात अत्यावश्यक सेवेतील लोकांना क्यूआर कोड ची संपूर्ण माहिती व इतर माहिती दिली जाणार असून त्या साठी एक कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.
No comments