उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून होळी आणि धूलिवंदन सणाच्या शुभेच्छा
मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला होळी आणि धूलिवंदन सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर साजरा होत असलेला होळीचा सण सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून सुरक्षित वातावरणात साजरा करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
होळी आणि धूलिवंदनाचा सण पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात साजरा करण्याची आपली प्रथा आहे. परंतु यंदा उत्सव साजरा करण्यावर मर्यादा आहेत. कोरोना संकटामुळे घालून दिलेल्या मर्यादांचे पालन करूनच यंदा होळीचा सण साजरा व्हावा. होळी साजरी करताना निसर्गाचे आणि पर्यावरणाचे रक्षण होईल, याची काळजी घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि हात वारंवार धुणे, या त्रिसुत्रीचे सर्वांनी पालन करावे. आपल्या सर्वांच्या जबाबदारीच्या वागण्यातूनच कोरोनावर मात करणे शक्य होणार आहे, याची जाणीवही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात करून दिली आहे.
No comments