शब-ए-बारात संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई - कोविड-१९ च्या अनुषंगाने यावर्षी सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता यावर्षी शब-ए-बारात अत्यंत साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने गृह विभागाच्यावतीने पुढील मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.
१. शब-ए-बारात निमित्त सर्व मुस्लीम धर्मीय बांधव आपआपल्या विभागातील मशिदीत रात्रभर नमाज, कुराण व दुवा पठण करतात. त्यामुळे बहुसंख्य मुस्लीम वस्तीत रात्रभर वर्दळ असते. तसेच काही ठिकाणी वाझ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी दि.२८ मार्च रोजीची रात्र व दि. २९ मार्च, २०२१ ची पहाट या कालावधीत (चंद्रदर्शनावर अवलंबून) येणाऱ्या शब-ए-बारात या उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे मिरवणुकांचे आयोजन न करता मशिदीत अथवा घरातच दुवा पठण करणे उचित ठरेल. त्या अनुषंगाने स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून जनजागृती करण्यात यावी.
२. शब-ए-बारात निमित्त स्थानिक मशिदीत नमाज पठणाकरीता येणाऱ्या मुस्लीम बांधवांनी कोणत्याही प्रकारची गर्दी न करता एका वेळी ४० ते ५० व्यक्तींनी टप्प्या-टप्प्याने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन व मास्कचा वापर करून दुवा पठण करावे.
३. मशिदीतील व्यवस्थापक यांनी मशिद व आजूबाजूच्या परिसरात निर्जंतुकीकरणाची व्यवस्था, सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर इ.) चे पालन होईल याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
४. शब-ए-बारात दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या वाझ या कार्यक्रमाचे आयोजन शक्यतो बंदिस्त जागेत करावे. परंतु खुल्या जागेत आयोजन केल्यास कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही व त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होईल याची दक्षता घेण्यात यावी.
५. कोविड-१९ च्या अनुषंगाने मुंबईमध्ये लागू असलेल्या फौजदारी दं.प्र.सं. कलम १४४ अन्वये जारी केलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे.
६. शब-ए-बारातच्या अनुषंगाने वाझ कार्यक्रमाचे आयोजक यांनी कार्यक्रमाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादी द्वारे उपलब्ध करून द्यावी.
७. कोविड-१९ च्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे परिपत्रकात म्हटले आहे.
No comments