Breaking News

साखर उद्योगास बळकटी देण्याची गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही; खा. रणजितसिंह यांची गृहमंत्री अमित शहा यांच्याशी साखर उद्योगावर चर्चा

अमित शहा यांचे स्वागत करताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर शेजारी देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, छ. शिवेंद्रराजे भोसले, रणजितसिंह मोहिते-पाटील, राहूल कुल व अन्य

        Home Minister Amit Shah testifies to strengthen sugar industry ; Ranjit Singh discusses sugar industry with Home Minister Amit Shah

        फलटण  : माढा लोकसभा मतदार संघाचे पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटी दरम्यान राज्यातील साखर उद्योगाबाबतची माहिती देत हा उद्योग वाचविण्यासाठी केंद्राने निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी केली. यावर तोडगा काढून साखर उद्योगास बळकटी दिली जाईल अशी ग्वाही शहा यांनी दिल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले आहे.

         माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी आज दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या प्रसंगी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी महिला व बालकल्याण  मंत्री पंकजाताई मुंडे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राहुल कुल, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आदींची उपस्थिती होती. या वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परस्थितीची माहिती मंत्री शहा यांना दिली. राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा कसा बोजवारा उडाला आहे, कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्रातील सरकार अपयशी ठरले आहे या बरोबरच पक्ष संघटनेच्या संदर्भामध्ये संपूर्ण आढावा शहा यांच्या समोर मांडला. चर्चे दरम्यान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्रातील साखर उद्योगाबाबत सविस्तर माहिती शिष्टमंडळाच्या दिली. साखर कारखान्याची महाराष्ट्रातील सद्य परिस्थिती काय आहे ? त्यावर येणाऱ्या अडचणींना राज्य सरकार साखर कारखान्यांना सहकार्य करित नाही. आजारी साखर कारखान्यांना केंद्र शासनाने कशा पद्धतीने मदत केली पाहिजे व साखर धंदा हा  महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये वाढविण्यासाठी कशी मदत होईल, साखर उद्योगा बरोबर साखर उद्योगाशी निगडित असणारे अन्य व्यवसाय इथेनॉल, कोजन या बाबतही केंद्र सरकारने काही भूमिका घेतल्या पाहिजेत अशी भुमिका खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मांडली. चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत सविस्तर माहिती घेऊन लवकरच यावर तोडगा काढला जाईल व या साखर उद्योगास बळकटी दिली जाईल अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

No comments