राज्यात सिंथेटीक ड्रग्ज व्यापाराच्या विरोधात विशेष मोहीम हाती घेणार - गृहमंत्री अनिल देशमुख
Home Minister Anil Deshmukh announced a special campaign against the trade in synthetic drugs in the state
मुंबई (अर्थसंकल्पीय अधिवेशन) : राज्यात सिंथेटीक ड्रग्ज व्यापाराच्या विरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असून अन्न व औषध प्रशासन, उद्योग विभाग व पोलीस यांच्या संयुक्त पथकांमार्फत ही मोहीम राबविली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सदस्य अबू आजमी यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ पथकाने मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केल्याबाबत प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात अंमली पदार्थसंबंधी गुन्ह्यातील 22 आरोपींना अटक झाली आहे. या गुन्ह्याचा तपास सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात काही कंपन्यांचे खोकल्याचे औषध हे नशेकरिता घेतले जाते. त्यासंदर्भात कशापद्धतीने नियंत्रण आणता येईल याबाबत राज्य शासनामार्फत प्रयत्न सुरु आहेत. औषध दुकानांमध्ये अशाप्रकारच्या औषधांचा साठा हा नियंत्रित रहावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्याचबरोबर केंद्र शासनाबरोबर चर्चा करुन योग्य ती पावले उचलण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये सिंथेटीक ड्रग्ज विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येईल. अशी मोहीम राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य असेल, असेही श्री.देशमुख यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री राहुल कुल, आशिष शेलार, रवींद्र वायकर यांनी भाग घेतला.
No comments