Breaking News

फलटण तालुका क्रीडा संकुलामध्ये महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते उद्घाटन

महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर शेजारी  प्रशिक्षिका

Inauguration of Women's Wrestling Training Center at Phaltan Taluka Sports Complex by Shrimant Sanjeevraje Naike Nimbalkar

        गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण -  ऑलिम्पिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी कुस्तीस आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवून दिला. ऑलंपिकवीर जाधव  यांच्या कामगिरीचा उल्लेख करुन, सातारा, सांगली व कोल्हापूर येथील पैलवानांच्या उत्तुंग कामगिरीचा आढावा घेत, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कुस्ती या खेळास अधिक जोमाने पुढे नेऊन गुणवंत पैलवान घडविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी  महिला कुस्ती केंद्राचे उद्घाटन  करून,  प्रशिक्षिका  श्रीमती अनिता गव्हाणे व श्रीमती स्मिता बोबडे यांना शुभेच्छाही दिल्या.

महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगीबोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

        क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा अंतर्गत तालुका क्रीडा संकुल समिती व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, जाधववाडी फलटण यांचे वतीने जागतिक महिला दिनानिमित्त तालुका क्रीडा संकुलामध्ये फलटण तालुक्यातील महिलांसाठी कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले. तालुका महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्राचा उद्घाटन  महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे  अध्यक्ष  श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.  

      महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्र उद्घाटन प्रसंगी फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसिलदार तथा कार्याध्यक्ष तालुका क्रीडा संकुल समिती समीर यादव, गटविकास अधिकारी श्रीमती डॉ. अमिता गावडे, जाधववाडी सरपंच श्रीमती सिमा गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य  श्रीमती सारिका चव्हाण, श्री. दिपक सपकाळ, महाराष्ट्र केसरी श्री. बापुराव लोखंडे, माजी नगरसेवक श्री. सुदामराव, मांढरे, श्री. नितीन भोग, श्री. निलेश जगदाळे, पै. संजय मदने व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जमदाडे (नाना), क्रीडा शिक्षक तुषार मोहिते व सचिन धुमाळ उपस्थित होते.

        कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांनी दिपप्रज्वलन करुन माता जिजाऊ व माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पुजन केले. त्यानंतर सर्व पाहुण्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. महेश खुटाळे, प्र. तालुका क्रीडा अधिकारी फलटण यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकामध्ये महिला दिना मागील भुमिका स्पष्ट करुन, तालुका क्रीडासंकुलाच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेऊन भविष्यातील नियोजनाबद्दल माहिती दिली. प्रमुख पाहुणे  डॉ. शिवाजीराव जगताप यांनी, महिला दिनानिमित्त सुरु करण्यात आलेल्या महिला कुस्ती केंद्राच्या योजनेबद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या. 

महिला कुस्ती सुरू करताना डॉ. श्रीमती अमिता गावडे, सरपंच श्रीमती सिमा गायकवाड व इतर

        त्यानंतर कुस्ती मॅटचे पुजन डॉ. श्रीमती अमिता गावडे यांच्या हस्ते करण्यात आले तर मॅटचे उद्घाटन महाराष्ट्र केसरी पै. बापुराव लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते कुस्तीच्या स्पर्धांचे उद्घाटन करुन पहिली कुस्ती त्यांच्या हस्ते सुरु करण्यात आली.

कुस्ती मॅटचे उद्घाटन करताना महाराष्ट्र केसरी पै. बापुराव लोखंडे

        कार्यक्रमाच्यामध्ये राष्ट्रिय व राज्य कुस्तीतील गुणवंत महिला, खेळाडु कु. काजल सतिश इंगळे, कु. राणी सिताराम पिसे, कु. संजुश्री जयवंत तांबे, कु. काजल सिताराम गायकवाड, कु. काजल विठ्ठल बागल, कु. अंजली मुळीक, कु. केतकी सावंत, कु. कल्याणी भगत, कु. ऐश्वर्या नेवसे, कु. अनुष्का यादव यांचा सत्कार करण्यात आला. 

        कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पै. अनिल कदम, क्रीडाशिक्षक यांनी केले. तर आभार समिर यादव, तहसिलदार फलटण यांनी मानले.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. किरण विचारे, श्री. संदिप ढेंबरे व श्री. अनिल मदने यांनी श्रम घेतले.

No comments