भुयारी गटार योजनेच्या कामाच्या दर्जाची व भ्रष्टाचाराची चौकशी करा अन्यथा वेगळी भूमिका घ्यावी लागेल - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी चर्चा करताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर शेजारी अशोकराव जाधव |
फलटण - फलटण शहरात सुरू असणारे भुयारी गटार योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून, त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. शहरात झालेल्या या कामाची क्वालिटी कंट्रोल मार्फत तपासणी करावी आणि नंतरच नवीन रस्त्याची कामे सुरू करावीत अशा सुचना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे चर्चेदरम्यान दिल्या आहेत. यासंदर्भात माहिती घेवून दोषी असतील तर कारवाई करु असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.
सातारा जिल्हा परिषदेतील बहुद्देशीय हॉलमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना सुचना दिल्या. या चर्चे वेळी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, डॉ. प्रविण आगवणे, नगरसेवक अशोकराव जाधव, जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, अभिजित नाईक निंबाळकर आदींची उपस्थिती होती.
फलटण नगरपालिकेच्या हद्दीतील रस्ते करण्यासाठी १४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत परंतु फलटण शहरात भुयारी गटर योजनेमध्ये शहरातील बहुतांशी भागातील रस्ते खोदून पाईप टाकण्यात आली आहे व ठिकठिकाणी चेंबरही बांधण्यात आले आहेत. रस्ते खोदून ते व्यवस्थित न बुझविल्याने त्याचा त्रास शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. सदर योजनेतील काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे आणि अशातच रस्ते तयार केले गेले तर ते देखील खराब होतील. त्यामुळे सदर रस्त्यांची कामे सुरू होण्यापुर्वीच भुयारी गटार योजनेच्या कामाची तपासणी क्वालिटी कंट्रोल मार्फत व्हायला हवी अशी सुचना खासदार रणजितसिंह यांनी केली.
भुयारी गटार योजनेच्या निकृष्ट कामांबाबत गटनेते अशोकराव जाधव यांनी नगर परिषद सभागृहात आवाज उठवला होता, परंतु सत्ताधारी गटाने त्याची दखल घेतली नाही. या योजनेच्या कामाची तपासणी फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्या समवेत केली आहे व या पाहणी दरम्यान चित्रिकरणही करण्यात आल्याचे व या बाबत जनहित याचिका दाखल केली असल्याचे खासदारांनी जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत याची दखल घेवून वर्क अॉर्डर थांबवावी, अन्यथा आम्हाला वेगळी भुमिका घ्यावी लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या कामाबाबत व त्याच्या दर्जाबाबत आपण माहिती घेवू व जर कोणी दोषी आढळले तर निश्चितपणे कारवाई करु असे अश्वासन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिले.
No comments