‘लाँग वीक एन्ड’साठी पर्यटकांच्या स्वागतास पुणे विभागातील एमटीडीसीची रिसॉर्ट सज्ज
मुंबई - : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची पुणे विभागातील सर्व पर्यटक निवासे सुरु असून कोरोना रोखण्यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेऊन पर्यटकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहेत.
कोरोना विरोधातील लढाईचा एक भाग म्हणून पात्र कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. जवळपास सर्वच पर्यटक निवासातील पात्र कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण सुरु झाले आहे. शिवाय आजअखेर एकही कोरोनाबाधित महामंडळाच्या पर्यटक निवासात निदर्शनास आलेला नाही.
पर्यटक निवासे आणि उपहारगृहे यांचे नव्याने निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. उपहारगृह आणि अनुषंगिक बाबींची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याबरोबरच शरिराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे, ऑक्सीमिटर, मुखपट्टी, हातमोजे अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दरम्यान, दि. 27 ते 29 मार्च आणि दि. 2 ते 4 एप्रिल अशा सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटक आणि आयटी क्षेत्रातील कर्मचारी पर्यटनासाठी इच्छूक आहेत. तथापि, कोरोनाची परिस्थिती आणि कामाचा ताण यांमुळे पर्यटक सध्या कमी प्रमाणात बाहेत पडत आहेत. पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने अभिनव संकल्पना आणली आहे.
‘एमटीडीसीतर्फे वर्क फ्रॉम नेचर’ ची सुविधा
मोफत वायफाय झोन; निसर्गाच्या सानिध्यात करता येणार ऑनलाईन काम
निसर्गरम्य असलेल्या महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये सध्या कोरोना रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेऊन आणि आवश्यक नियमांचे पालन करुन डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शुट यांना बहर आला आहे. एमटीडीसीची सर्वच पर्यटक निवासे ही मनोहारी समुद्रकिनारे, ऐतिहासिक ठिकाणे, निसर्गरम्य डोंगररांगा आणि थंड हवेच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे या ठिकाणी डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शुट, रिसेप्शन म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील अनमोल क्षण कायमस्वरुपी संस्मरणीय करण्यासाठी एमटीडीसीच्या निसर्गरम्य पर्यटक निवास आणि परिसरात येत आहेत. महामंडळानेही अशा हौशी पर्यटकांसाठी सवलती जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शुट, रिसेप्शन फोटोशुट, कार्पोरेट कंपन्यांच्या बैठका आणि “वर्क फ्रॉम नेचर” यांना महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये खास सवलत देण्यात येणार असल्याने पर्यटकांमध्ये उत्साही वातावरण आहे.
“वर्क फ्रॉम नेचर” आणि “वर्क विथ नेचर”
वाढत्या कोरोना रूग्ण संख्येमुळे आयटी आणि इतरही कंपन्यांकडून नव्याने “वर्क फ्रॉम होम” जाहीर आले आहे. त्यामुळे कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांना आणि खाश्या पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेत काम करता यावे, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पर्यटनस्थळावरील रिसॉर्टमध्ये मोफत वायफाय झोन सुविधा दिली आहे. त्यानुसार ‘वर्क फ्रॉम होम’च्या धर्तीवर “वर्क फ्रॉम नेचर” आणि “वर्क विथ नेचर” अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या पर्यटनस्थळावरून काम करीत पर्यटनाचा आनंद द्विगुणित करीत आहेत. टप्प्याटप्प्याने राज्यभरातील ‘एमटीडीसी’ च्या सर्व रिसॉर्टवर अशी सुविधा होणार आहे. कार्यालयातील कर्मचारी वर्गालाही एकाच वातावरणात सतत काम करून मानसिक थकवा येतो. त्यांच्या क्रयशक्तीवरही परिणाम होतो. नोकरदारवर्गाची जशी अडचण होते तशीच अडचण विविध प्रकल्पांवर काम करणारे अधिकारी, गुंतवणूकदार किंवा व्यापारी, उद्योजकांचीही होते. अशा सर्वच घटकांना निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेत काम करता यावे, यासाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या रिसॉर्टवर वायफाय झोनची सुविधा दिली आहे. चार-पाच दिवसांची सुट्टी घेत रिसॉर्टवर जाऊन ठराविक वेळेत काम व उर्वरित वेळेत पर्यटनाचा आनंद घेणे शक्य आहे. या सुविधेमुळे कामात येणारे अडथळे दूर होण्यास मदत होईल. याशिवाय रोज त्याच त्या ठिकाणी बसून काम करण्याचा आलेला कंटाळा घालवून निसर्गाच्या सानिध्यात राहून चांगले काम करता येणे शक्य होणार आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना एमटीडीसीचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दीपक हरणे म्हणाले की, “महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) राज्यातील विविध रिसॉर्टवर वायफाय सुविधा दिली आहे. यात पर्यटन झोनवरील सुविधा मोफत आहेत, तर एखाद्या पर्यटकाला त्याने मागणी केल्यास त्याच्या निवासी कक्षातही अशी सुविधा देण्यात येईल. अशी सुविधा पहिल्या टप्प्यात कोयनानगर, माथेरान, महाबळेश्वर येथे झाली आहे. यापुढील टप्प्यात तारकर्ली, गणपतीपुळे, माळशेजघाट, पानशेत येथील रिसॉर्टवरही ही सुविधा सुरु होईल. तथापी, पर्यटकांनी कोरोना रोखण्यासाठी आवश्यक काळजी घेत महामंडळाच्या पर्यटक निवासात यावे. या ठिकाणी पर्यटकांना सर्व सुविधा आणि कोरोनाबाबतची योग्य ती सर्व खबरदारी घेतल्याचे दिसून येईल. त्यामुळे निसर्गाचे भान ठेवून आणि कोरोनाबाबत दक्षता घेऊन पर्यटन करावे,” असे आवाहन केले.
अधिक माहिती आणि रिसॉर्ट बुकिंगसाठी www.maharashtratourism.gov.in या वेबसाईटवर संपर्क करावा.
No comments