Breaking News

महिलांची आर्थिक फसवणूक ; राष्ट्रवादीच्या माजी आमदारासह चौघांवर गुन्हा दाखल करण्याचे फलटण कोर्टाचे आदेश

Phaltan court orders to file charges against four including former NCP MLA

        गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 27 मार्च  2021 -  अजित मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी या संस्थेच्यावतीने महिलांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फलटण येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी संस्थेचे सर्वेसर्वा व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्यासह अन्य तिन जणांविरुध्द गुन्हा नोंद करून तपासाचे आदेश दिले आहेत अशी माहिती ॲड सलिम शेख यांनी दिली आहे. 

        या बाबतची माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील सासवड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक टेकवडे हे संस्थापक असलेल्या अजित नागरी पतसंस्था व अजित मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीची शाखा साखरवाडी ता. फलटण येथे आहे. या शाखेमध्ये दीपक बाळासो सस्ते, शब्बीर दस्तगिर मुलाणी व नईम युसूफ मेटकरी हे कर्मचारी म्हणून काम पाहतात. त्यांनी महिलांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यांच्या घरी जावून सह्या केलेले कोरे धनादेश व स्टॅम्प घेत कर्ज वितरीत करतात. वीस हजार रुपये कर्ज रक्कम मंजूर करुन प्रत्यक्षात मात्र ते प्रोसेसिंग फी, कमिशन, शेअर्स आदीसाठी तिन हजार ३५० रुपये कपात करुन सोळा हजार ६५० रुपये एवढी रक्कम महिलांच्या हाती दिली.  महिलांनी कर्जाचे हफ्ते भरुनही संबंधित कर्मचारी त्यांना पावत्या देत नव्हते. महिलांनी कर्जाची रक्कम परत करुन कर्ज निल झाल्याच्या दाखल्याची मागणीही केली होती. २०१९ पर्यंत सर्व व्यवहार पुर्ण करुनही कर्मचारी महिलांना साखरवाडी व सासवड येथे चकरा मारायला लावत होते व आमची पावती देण्याची पध्दत नाही असे सांगत होते. लॉकडाउनच्या कालावधीत न्यायालये बंद असताना संस्थेने स्वतःच लवाद नेमणूक करुन काही महिलांचे एकतर्फी लवाद निर्णय घेतले. तसेच महिलांचे बचत खाते गोठवणे, जप्ती नोटीस देणे सुरु झाले. या बाबत फलटण येथील महिलांनी २६ आक्टोंबर २०२० रोजी सासवड येथील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून संबंधित संस्थेच्या गैर प्रकाराच्या चौकशीची मागणी केली होती. या बाबतची पोलिस प्रशासनास देत कारवाईची मागणी करण्यात आली होती. परंतू त्यांना त्यांच्याकडून  पुरावे आणा नंतर कारवाई करु असे ऐकण्यास मिळाले. शोषित महिलांना कुठेही न्याय मिळत नाही हे पाहून अखेर अश्विनी विनोद डावरे, सीमा महेन्द्र भाटी, शितल शाम सुर्यवंशी, पूजा योगेश पालखे, राजश्री रविराज कोठी सह चोवीस महिलांच्या गटाने फलटण येथील न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने फिर्यादीची फिर्याद, दाखल केलेले पुरावे व त्यांच्या वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य मानून फलटण ग्रामीण पोलिसांना संबंधित अशोक टेकावडे, दीपक सस्ते, शब्बीर मुलाणी व नईम युसूफ मेटकरी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश न्यायमुर्ती उज्वला वैद्य यांनी दिले असल्याची माहिती फिर्यादींचे वकील ॲड. सलिम शेख यांनी दिली आहे.

No comments