हिंदूरावांचे स्वप्न सत्यात ; आता फलटणची डायरेक्ट कनेक्टिव्हिटी पुण्याशी - केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण - दि. 30 मार्च 2021 - फलटण पुणे रेल्वे चा शुभारंभ होताना मला आनंद होतोय की, आता फलटणची डायरेक्ट कनेक्टिव्हिटी पुण्याशी झालेली आहे, मी पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवत असताना, मी हिंदुराव नाईक निंबाळकर यांची भेट घ्यायचो त्यावेळेस आमची बऱ्याच विषयावर चर्चा व्हायची, त्यामध्ये प्रामुख्याने फलटण पुणे रेल्वे डायरेक्ट कधी होणार, याविषयी चर्चा व्हायची आणि आज हिंदुरावांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरत आहे, आज फलटण पुणे रेल्वे सेवेचा शुभारंभ होत असताना मला आनंद होत असल्याचे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या ऑनलाइन भाषणामध्ये सांगितले.
फलटणकरांना बहुप्रतिक्षेची असलेल्या फलटण ते पुणे या नियमित डेमू रेल्वेसेवेचा शुभारंभ आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ऑनलाइन झाले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार, सातारा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खा. गिरीश बापट, खा. श्रीनिवास पाटील, खा. सुप्रिया सुळे, खा. वंदना चव्हाण, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आ. चंद्रकांत पाटील आ. सुनील कांबळे, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सूनीत शर्मा आदी मान्यवर ऑनलाईन तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खा.छत्रपती उदयनराजे भोसले हे प्रत्यक्ष रेल्वे शुभारंभास उपस्थित होते.
फलटण-पुणे रेल्वेसेवा शुभारंभ होताना नेत्यांची अनुपस्थुती प्रकर्षाने जाणवत आहे - खा. रणजितसिंह
लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी स्वप्न पाहिलेल्या, फलटण पुणे रेल्वे सेवेचा शुभारंभ आज होत असताना, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकनेत्यांचे उणीव जाणवत असल्याची खंत खा. रणजितसिंह यांनी आपल्या भाषणातही व्यक्त केली. आपल्या स्वागतपर भाषणात बोलताना, खा. रणजितसिंह म्हणाले की, फलटण पुणे रेल्वे सेवेचा शुभारंभ होताना माझ्या वडिलांची म्हणजेच लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांची अनुपस्थिती प्रकर्षांने जाणवत आहे. 23 वर्षे त्यांनी सातत्याने रेल्वेप्रश्नासाठी संघर्ष केला होता, आज त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होत असताना त्यांची उणीव भासत आहे.
फलटण-पुणे रेल्वेसेवा शुभारंभ बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर |
माझ्यासाठी हा भावनिक प्रसंग असल्यामुळे मी जास्त काही बोलत नाही परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री पियुष गोयल तसेच सर्व रेल्वे स्टाफ - कर्मचारी या सर्वांचे मी आभार मानत आहे, तसेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांचेही आभार मानावे लागतील कारण मी खासदार झाल्यानंतर मतदारसंघात दिलेल्या शब्दासाठी या सर्व नेत्यांनी पूर्ण सहकार्य करून मला ताकद दिली व मी दिलेले शब्द पूर्ण केले आहेत.
फलटण पुणे रेल्वे सुरू होणे हे स्वप्न माझ्या वडिलांचे होते तसेच ते फलटण तालुक्याचेही होते, आज हे स्वप्न पूर्ण करताना निश्चितपणे वेगळी भावना आणि वेगळी कृतज्ञता जनतेविषयी आहे, कारण त्यांनी मला खासदार म्हणून निवडून दिले, म्हणूनच मी रेल्वेप्रश्न, पाणीप्रश्न तसेच इतर विकास कामे पूर्ण करू शकलो, त्याबद्दल मी जनतेचा ऋणी आहे अशी भावना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
फलटण पुणे रेल्वेला स्व. हिंदुरावांचे नाव द्यावे - खा. छ. उदयनराजे भोसले
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी फलटण पुणे रेल्वे सेवेचा शुभारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवरांना शुभेच्छा देऊन, स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी रेल्वे प्रश्नासाठी केलेल्या कामाची आठवण म्हणून तसेच केलेल्या कार्याचा गौरव म्हणून फलटण पुणे रेल्वेला स्वर्गीय हिंदुराव भाऊंचे नाव द्यावे अशी व्यासपीठावरून मागणी केली.
फलटण-पुणे रेल्वेसेवा शुभारंभ बोलताना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले |
No comments