हिंदकेसरी पैलवान मारुती माने यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
हिंदकेसरी पुस्तकाचे प्रकाशन करताना खा. श्री. छ .उदयनराजे भोसले शेजारी डॉ .सुनील मंत्री, डॉ .अभिराम पेंढारकर सुनील काटकर व इतर |
सातारा - संपूर्ण कुस्ती जगात पैलवान मारुती माने यांचे नाव हे त्यांच्या कुस्ती खेळातील चढाया आणि विशेष योगदानाने जागतिक पातळीवर गेले आहे. देशपातळीवरील हिंदकेसरी किताब मिळवून कुस्ती खेळाच्या प्रेमींसाठी पैलवान मारुती माने हे नाव खऱ्या अर्थाने मनात कोरले आहे. यांच्या कार्याची दखल हिंदकेसरी या पुस्तकाने घेतल्याचे विशेष आनंद होतो. या पुस्तकाचे लेखक डॉ. सुनील मंत्री यांचे करावे तेवढे अभिनंदन हे कमीच आहे. त्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील एका खऱ्याखुऱ्या खेळाडूचे वास्तववादी जीवन आणि त्याच्या कडून खेळाला मिळालेली मोठी देणगी याचा वृत्तांत या पुस्तकात सादर केला आहे. हे खरोखरच कौतुकास्पद आहे. असे उद्गार सातारा येथील राज्यसभेचे खासदार श्री .छ उदयनराजे भोसले यांनी काढले .
डॉ.सुनील मंत्री यांनी लिहिलेल्या हिंदकेसरी पैलवान मारुती माने या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच खासदार उदयनराजे भोसले यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून जलमंदिर पॅलेस येथे संपन्न झाला. यावेळी बोलताना उदयनराजे भोसले यांनी वरील उद्गार काढले. या पुस्तका विषयी माहिती देताना डॉ.मंत्री म्हणाले की, या हरहुन्नरी खेळाडूचे संपूर्ण चरित्र पुढील पिढीसाठी कळावे तसेच त्यांनी कुस्तीसाठी दिलेले योगदान लोकांपुढे यावे या भूमिकेतून मी हे पुस्तक लिहीत गेलो .तसेच त्यांचे वर चित्रपट काढण्याची ही माझी असलेली संकल्पना आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून निश्चित लवकरच पूर्ण होईल असा मला विश्वास वाटतो .
यावेळी सातारा येथील डॉ. अभिराम पेंढारकर, जि .प. माजी शिक्षण सभापती सुनील काटकर ऍड. योगेंद्र सातपुते, अमित काळे, श्री. मिरजकर, श्री .निलगिकर यांची उपस्थिती होती.
No comments