रेल्वे - एमआयडीसी - रस्ते - नीरा देवघर पाणी ही प्रमुख कामे सोडून इतर 76 कोटींची कामे केली ; तुम्ही 30 वर्षात फलटणची काय अवस्था केलीय - खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना खा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, विश्वासराव भोसले, धनंजय साळुंखे-पाटील, नगरसेवक अशोक जाधव, जयकुमार शिंदे, अभिजीत नाईक निंबाळकर, बजरंग गावडे |
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण - मला षटकार मारायची सवय असल्यामुळे मी सत्तेत आल्या आल्या पहिल्याच षटकारा मध्ये कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला रेल्वे प्रश्न सोडवला, दुसऱ्या षटकारात फलटणला दुसरी एमआयडिसी मंजूर केली, फलटण - आदर्की व फलटण म्हसवड रस्त्यांची कामे मार्गी लावली तसेच नीरा-देवघरचे पळवलेले पाणी परत आणण्याचे काम केले यासह जवळपास 76 कोटींचा निधी मतदारसंघातील तसेच फलटण तालुक्यासह मतदार संघाच्या विकास कामांसाठी आणलेला आहे. त्याची मंजुरी पत्र माझ्याकडे आहेत आणि रामराजे विचारतात खासदारांनी काय आणले ? रेल्वे, एमआयडीसी, रस्ते, नीरा देवघर पाणी ही प्रमुख कामे सोडून केलेल्या 76 कोटीच्या कामांमध्ये रस्ते, पाझर तलाव, सिमेंट बंधारे, साकव पूल, पिकअप शेड, पेव्हींग ब्लॉक, हायमास्ट दिवे अशी कामे केली असल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगून, श्रीमंत रामराजे यांच्याकडे 30 वर्षे सत्ता असून शहरासह तालुक्यासाठी काय केले? शहरातील व तालुक्यातील रस्त्यांची काय अवस्था आहे, तालुक्याचा कोणताही विकास झालेला नाही, 30 वर्षात काहीच विकास करू शकलो नाही हे लक्षात आल्यानंतर आता, मी पाठपुरावा करून मंजुरी आणलेल्या फलटण - आदर्की रस्त्याच्या कामाचे श्रेय घेऊ लागले असल्याची टीका खा. रणजितसिंह यांनी केली.
हॉटेल निसर्ग, सुरवडी ता. फलटण येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. याप्रसंगी दिशा कमिटी सदस्य विश्वासराव भोसले, माजी पंचायत समिती सदस्य व युवा नेते धनंजय साळुंखे-पाटील, नगरसेवक अशोक जाधव, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, बजरंग गावडे, नानासाहेब इवरे, भाजपा शहराध्यक्ष अमोल खराडे उपस्थित होते.
श्रीमंत रामराजे दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय घेत आहेत - खा. रणजितसिंह
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जो फलटण आदर्की रस्त्यासाठी 176 कोटी मंजूर करून आणले असल्याचा दावा केला आहे, त्या रस्त्यासाठी प्रत्यक्षात मी पाठपुरावा केला आहे. सदरचा रस्ता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मंजूर केला होता. त्याची घोषणाही रेल्वे शुभारंभ प्रसंगी मी केली होती. राज्यात एशियन डेव्हलपमेंट बँकेमार्फत फलटण ते आदर्की व फलटण ते म्हसवड या रस्त्यांचा सर्वे करण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री यांनी मान्यता दिली होती व प्रस्ताव सादर करावा असे आदेश दिले होते. आणि आज रामराजे त्याचे श्रेय घ्यायला पाहत आहेत. तीस वर्षात काहीच करू शकलो नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय घेऊ लागले असल्याची टीका खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.
नाईकबोमवाडी एमआयडीसी न करण्यासाठी श्रीमंत रामराजेंकडून प्रशासनावर दबाव
फलटण मध्ये नाईकबोमवाडी येथे मी दुसरी एमआयडीसी मंजूर करून आणली होती आणि त्याची घोषणा देखील केली होती. परंतु मंजूर केलेल्या एमआयडीसीमध्ये खोडा घालण्याचे काम याच रामराजे यांनी केले आहे. त्याचे पुरावेही माझ्याकडे आहेत. नाईकबोमवाडी एमायडिसी करायची नाही म्हणून रामराजे यांच्याकडून प्रशासनावर दबाव आणला जात असल्याचा आरोप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी केला.
नीरा देवघरचे पाणी रामराजे यांनी परत बारामतीला नेले
खासदार झाल्यानंतर महिना-दीड महिन्यात मी प्रलंबित असणारी फलटण रेल्वेचा प्रश्न मार्गी लावला तसेच एमआयडीसी मंजूर करून आणली, नीरा-देवघर धरणाचे पाणी परत आपल्या भागात आणले. एक ते दोन महिन्याच्या आत ही कामे केली आहेत. कामे कशी करायची हे आपण दाखवून दिले आहे. मी बोलतोय ती सर्व कामे आदेशित केले आहेत. धरणाचे पाणी देखील मी काही दिवसातच आपल्या भागात आणले होते, तसे आदेशही झाले, परंतु सत्ता बदल झाल्यानंतर रामराजे यांनी, पुन्हा बारामतीकरांना पाणी दिले, इतकेच नाही तर फलटण बारामती रेल्वे प्रश्नी देखील खासदार शरद पवार व अजित पवार यांना रामराजे चुकीचा सल्ला देत आहेत व फलटण-बारामती रेल्वे कशी होऊ नये हे पाहत असल्याचा आरोप देखील खा. रणजितसिंह यांनी केला.
भुयारी गटार योजनेचा भ्रष्टाचार झाकायचा आहे म्हणून त्यावर नवीन रस्ते
शहरात सुरू असणारी भुयारी गटार योजना देखील निकृष्ट दर्जाचे असून यामध्ये आम्ही क्वालिटी कंट्रोल टेस्टची मागणी केली होती या भुयारी गटार योजनेचे टेस्टिंग न करता त्याच्यावर आता नवीन रस्ते करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला आहे. निकृष्ट काम झाकण्याचे काम हे सत्ताधारी करत आहेत. मलनिस्सारण योजनेतील भ्रष्टाचार झाकायचा आहे म्हणून यांना नवीन रस्ते करायचे असल्याचा आरोप यावेळी खा. रणजितसिंह यांनी केला.
30 मार्च ला फलटण – पुणे रेल्वेचा शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने येत्या 30 मार्च 2021 रोजी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते फलटण – पुणे रेल्वे सेवेचा शुभारंभ होणार असल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी जाहीर केले.
ही घ्या! खासदारांनी केलेली कामे
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खासदार झाल्या पासून केलेल्या केलेली विकास कामे सांगताना भाजपाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी सांगितले की, खा. रणजितसिंह यांनी खासदार होताच, नीरा देवघरचे पळवलेले पाणी, फलटण लोणंद रेल्वे प्रश्न, नाईकबोमवाडी एमआयडिसी व रस्ते ही कामे त्वरित मंजूर केली. त्याचबरोबर ठेव अंशदान अंतर्गत फलटण शहरातील प्रभाग क्रमांक 4, 5 व 12 मध्ये 8 रस्ते सुधारणा करण्याची एकूण 50 लाख रुपयांची कामे, पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून फलटण तालुक्यात आदर्की बुद्रुक ते हिंगणगाव, खुंटे ते येळेवस्ती, मुरूम ते तडवळे, निंबळक ते मठाचीवाडी, निंबळक ते शेरे वस्ती, तरडगाव ते सूळ वस्ती, विडणी ते वडले असे एकूण 23 कोटी रुपये खर्चाचे 7 रस्ते मंजूर झाले आहेत.
ताथवडा, वाघोशी, आदर्की खुर्द, ताथवडा, झडकबाईचीवाडी, मिरेवाडी, गिरवी, धुमाळवाडी, सासकल, जावली येथे 2 कोटी 95 लाख रुपयांचे साकव पूल मंजूर केले. वेळोशीचा मळा, तरडफ दरा, शेरेचीवाडी, उपळवे, ढवळ, कुरवली बुद्रुक, जांभळी चा मळा, कुरवली बुद्रुक येथे 30 लाख रुपयांचे विशेष दुरुस्ती पाझर तलाव मंजूर केले. बोडकेवाडी, आदर्की बुद्रुक, कुरवली बुद्रुक, येथे 65 लाख रुपये किमतीचे नवीन सिमेंट काँक्रीट बंधारे, ढवळ, जाधववाडी, मुंजवडी, मठाचीवाडी, आसू, पिंपरद, सांगवी येथे 52 लाख रुपये किंमतीचे एकूण 7 पिकअप शेड मंजूर केले.
फलटण शहरात विविध प्रभागांमध्ये ( 49 लाख रुपये) एकूण 38 हायमास्ट दिवे बसवण्यात आले आहेत. फलटण तालुक्यातील जन सुविधा मधील आराखडा 2021 22 अंतर्गत तालुक्यातील 125 ठिकाणी सुशोभिकरण, डांबरीकरण, वॉल कंपाऊंड, शेड, पेविंग ब्लॉक, खडीकरण, मंदिर कळसाचे काम, अंतर्गत रस्ते, डांबरीकरण आदी 3 कोटी आठठयांन्नव लाख रुपयांची विकासकामे मंजूर करून आणली आहेत. तसेच लघुपाटबंधारे अंतर्गत सासवड, मानेवाडी, मांडवखडक, आदर्की, विंचुर्णी, निरगुडी येथील बंधारे प्रस्तावित आहेत तसेच इतरही अनेक पेविंग ब्लॉक बसवणे स्मशानभूमी सुशोभीकरण पिकअप शेड रस्ते हायमास्ट दिवे अशी कामे मंजूर असून काही कामे प्रस्तावित असल्याचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी सांगितले.
भुयारी गटार योजनेला आमचा विरोध नाही - नगरसेवक अशोक जाधव
फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक अशोक जाधव यांनी यावेळी सांगितले की, फलटण शहरातील कोणत्याही विकासकामाला आम्ही विरोध केलेला नाही, विकास कामांमध्ये कधीही आम्ही अडथळा आणलेला नाही, भुयारी गटार योजनेला देखील आमचा विरोध नाही, फक्त त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामास विरोध आहे आणि हे निकृष्ट दर्जाचे काम झाकण्यासाठी त्याच्यावर सत्ताधारी नवीन रस्ते करणार आहेत, त्याला आमचा विरोध आहे या प्रकरणी आम्ही हायकोर्ट पर्यंत गेलो असल्याचे अशोक जाधव यांनी सांगितले.
No comments