निवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जीवन बोके यांचा आत्मदाहनाचा इशारा
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण - सातारा पोलीस दला अंतर्गत फलटण शहर पोलीस ठाणे येथून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरून निवृत्त झालेल्या जीवन बोके यांना प्रशासनाच्या दिरंगाई भूमिकेमुळे आर्थिक विवंचनेला तोंड द्यावे लागत आहे. स्वतः जीवन बोके यांना वर्षांपूर्वी पॅरॅलीसीस चा अटॅक येऊन गेला आहे तर त्यांच्या पत्नी या कॅन्सरशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीमध्ये बोके कुटुंबियांना येणारा खर्च वाढू लागला आहे आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ग्रॅज्युएटी व पेन्शन विक्रीची रक्कम अद्याप बोके यांना मिळालेली नाही. बोके यांनी प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार केला परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी जीवन बोके यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
जीवन बोके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मी दिनांक 30 जून 2019 रोजी सातारा पोलीस दलातंर्गत फलटण शहर पोलीस ठाणे येथून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालो. आज अखेर मला माझे शिल्लक पेन्शन विक्रीचे व ग्रॅच्युएटी पैसे मिळालेले नाहीत व गेले 8 महिन्यांची तात्पुरती पेन्शन मिळाली नाही.
वरील संदर्भन्वाये मी दि. 9/01/2021 रोजी कोल्हापूर आय. जी, व सातरा एस. पी. यांना समक्ष भेटलेलो असून अजुनतरी मला कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही, माझ्या पत्नीस ब्लड कॅन्सर असून तीस दरमहा 10,000/- रुपयाचे औषधे (डासाटीनीब) चालू असून, अखेरपर्यंत ही औषधे चालू ठेवावयाची आहेत. मला वर्षापुर्वी पॅरॅलिसीसचा दौरा आलेला होता. त्यामधून मी बरा होत आहे. अशाप्रकारे आम्हा उभयतांचा वैदयकीय खर्च दर महा रु. 16000/- आहे. हा खर्च पेन्शन मधून भागत नाही.
मी गेले वर्षभर वरील बाबींचा प्रयत्न, प्रत्यक्ष भेटीतून तसेच पत्रव्यवहारातून करत आहे. परंतू कोणत्याही स्तरावर कसलाच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे व मी कर्जबाजारी झाल्यामुळे माझ्यासमोर आत्मदहनाशिवाय पर्याय नाही. मी दि. 12 मार्च 2021 या रोजी आत्मदहन करत असलेचा ईशारा देत आहे.
No comments