Breaking News

आरोग्य विभागातील अ, ब संवर्गातील पदभरतीबाबत सर्व संबंधित विभागांसोबत लवकरच बैठक – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे

Soon meeting with all concerned departments regarding recruitment in A, B category of health department - Public Health Minister Rajesh Tope

        मुंबई - : आरोग्य विभागातील ‘ड’ संवर्गाची पदे महिनाभरात भरली जातील. ‘क’ संवर्गातील 50 टक्के पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे व उर्वरित 50 टक्के पदांबाबत आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर ही पदे भरली जातील. अ व ब संवर्गाच्या बाबतीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती नियमात बदल होत आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या महिन्याभरात मुख्य सचिवांकडे आरोग्य, सामान्य प्रशासन, विधी व न्याय अशा सर्व संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेऊन प्रश्न सोडविला जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत दिली. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व संवर्गातील पदे भरण्याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

        आरोग्य मंत्री श्री.टोपे म्हणाले, सार्वजनिक आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कोविड काळात 26 हजार 486 पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली आहेत. विभागात 54 केडर आहेत. त्यापैकी 2-3 केडरच्या अनुषंगाने काही प्रश्न निर्माण झाले त्याबाबत चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. विशेषज्ञ डॉक्टरांची पदे भरणेबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. कोविड काळात काम करणाऱ्या ज्या कंत्राटी डॉक्टरांचे वेतन प्रलंबित आहे, त्यांचे वेतन तातडीने देण्यात येईल. ज्या कंत्राटदारांनी डॉक्टरांना वेतन दिले नसेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी दिली.

        यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री विनायक मेटे, भाई जगताप, महादेव जानकर, निरंजन डावखरे आदींनी सहभाग घेतला.

No comments