Breaking News

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या मागणीनुसार पोंभुर्ले येथील बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार सन्मान योजनेसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतुद

Special provision in the budget for Balshastri Jambhekar Smarak and Patrakar Sanman Yojana as per the demand of Maharashtra Journalist Welfare Fund

        फलटण  - :  मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे राज्यातील पहिले स्मारक बाळशास्त्री यांच्या जन्मगावी पोंभुर्ले (ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग) येथे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने पोंभुर्ले, जांभे - देऊळवाडी ग्रामस्थ व पोंभुर्ले ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने 2004 मध्ये उभारले आहे.  या स्मारकाची दुरुस्ती आणि सुशोभीकरणाचा आराखडा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे सादर केला होता. त्याप्रमाणे उपमुख्यमंत्र्यांनी दि.5/1/2021 रोजी त्यांच्या कार्यालयात विशेष बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये आश्‍वासन दिल्याप्रमाणे आज जाहीर झालेल्या राज्य अर्थसंकल्पात याबाबत आवश्यक तो निधी देण्याची तरतूद करण्यात आली असून त्याचप्रमाणे संस्थेने मागणी केल्यानुसार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेसाठी आणखी दहा कोटी रुपये देण्याची अर्थसंकल्पीय तरतूद आज राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांनी जाहीर केली आहे. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी च्या या दोन्ही मागण्यांची दखल उपमुख्यमंत्र्यांनी घेतल्याबद्दल संस्थेने त्यांचे व मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांचे खास आभार मानले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ, उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव व कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके,  विश्‍वस्त अमर शेंडे, रोहित वाकडे यांनी एका  प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

        आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले (ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग) येथील स्मारकासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच स्वर्गीय शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या व्याजातून ज्येष्ठ पत्रकारांना निवृत्तीवेतन देण्यात येते. त्यासाठी सध्या 25 कोटी रुपयांची ठेव असून त्यात 10 कोटी रुपयांची भर जाहीर करत असल्याचे, ना.अजितदादा पवार यांनी आज विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प मांडताना जाहीर केले आहे. पोंभुर्ले येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाच्या दुरुस्तीचा व सुशोभीकरणाचा प्रकल्प पोंभुर्ले ग्रामपंचायत व जांभे ग्रामस्थ आणि स्मारकासाठी मदत करणारे पत्रकार व हितचिंतक यांच्या सहकार्याने पूर्ण केला जाईल. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि पर्यटन राज्यमंत्री ना.आदिती तटकरे यांच्या सहकार्याने तसेच खा. विनायकराव राऊत यांच्या मदतीने पोंभुर्ले येथील केवळ स्मारकच नव्हे तर संपूर्ण पोंभुर्ले गाव पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील आदर्श गाव करण्यासाठी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी पुढाकार घेणार आहे, अशीही माहिती रवींद्र बेडकीहाळ यांनी दिली. तसेच पोंभुर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच सादिक डोंगरकर, अ‍ॅड.प्रसाद करंदीकर, जेष्ठ नेते शांताराम गुरव, जांभे-देऊळवाडीचे सर्व ग्रामस्थ, युवक यांनी जांभेकर स्मारकासाठी अर्थसंकल्पातील तरतुदीबाबत समाधान व्यक्त करून मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांचे खास अभिनंदन केले आहे.

No comments