फलटण शहरासह तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण - दिनांक 21 मार्च रोजी दुपारी 4 वाजल्यापासून फलटण शहरासह ग्रामीण भागात वादळी वारा, विजांचा कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गहू, ज्वारीसह आंब्याचा मोहराचे, द्राक्षे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यावर्षी फलटण तालुक्यात रब्बीची पिके चांगली असल्याने बळीराजाने मोठ्या उत्साहात रब्बीच्या काढणी, मळणीला सुरुवात केली होती, बाजारात भुसार मालाला दर समाधानकारक आहेत, मात्र आज झालेल्या पाऊस आणि वादळी वाऱ्याने या सर्वांवर वीरजन पडले आहे. महावितरण च्या तारा तुटल्या, काही डीपि व वितरण सेंटरवर तात्पुरत्या स्वरुपात उभारलेले छत उडून गेले. तालुक्यातील गहू, ज्वारीची पिके ठिक ठिकाणी भुईसपाट झाली आहेत. पावसामुळे शहरात ठिकठिकाणी लाईट गेली होती. तर भुयारी गटार खुदाईत रस्त्यावर आलेल्या मातीमुळे रस्ते निसरडे झाले. काही ठिकाणी चिखल झाला होता.
No comments