Breaking News

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करावी - जिल्हाधिकारी शेखर सिंह

Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Jayanti should be celebrated simply - Collector Shekhar Singh

    सातारा दि. 9 (जिमाका): दरवर्षी 14 एप्रिल या दिवशी परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक अनुयायी मोठ्या संख्येने जमुन तसेच जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येऊन परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती राज्यात ठिकठिकाणी साजरी करतात, परंतु यावर्षी कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी अत्यंत साधेपणाने सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 8 वाजण्यापूर्वी परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

    या वर्षी कोविड-19 विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता दरवर्षीप्रमाणे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका जयंती निमित्त काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना त्या ठिकाणी अनुयायांची संख्या एकावेळी 5 पेक्षा जास्त नसावी. तसेच सोशल डिस्टंन्सींगचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पालन करुन परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी.

    दरवर्षी परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, परंतु यावर्षी कोविड-19 विषाणुचा प्रादुर्भाव पहाता सार्वजनिक ठिकाणी गाणी, व्याख्याने, पथनाट्य इत्यादीचे सादरीकरण अथवा इतर कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जयंती निमित्त करण्यात येऊ नये. त्याऐवजी कार्यक्रमाचे केबल नेटवर्कद्वारे अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

    परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी आरोग्य विषयक उपक्रम, शिबीरे (उदा. रक्तदान) स्थानिक प्रशासनाच्या पुर्वानुमतीने आयोजित करता येतील आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करता येईल. तथापी आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टंन्सींग तसेव स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याचे विशेष लक्ष देण्यात यावे.

    राज्यातील कोविड-19 विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे कोटेकोर पालन करावे. तसेच या आदेशानंतर व प्रत्यक्ष जयंती दिनाचा कार्यक्रम सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत शासनस्तरावरुन व या कार्यालयाकडून आणखी काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करण्याबाबत बंधनकारक राहील.

    आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास त्यांचे विरुद्ध यस्थास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार दंडनीय/कायदेशीर कारवाई पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी करावी, असेही जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

No comments