Breaking News

बाळशास्त्री जांभेकरांचे मुंबईत स्मारक व्हावे; नियोजित कोकण विद्यापीठाला बाळशास्त्रींचे नाव द्यावे

There should be a memorial of Balshastri Jambhekar in Mumbai; The planned Konkan University should be named after a pediatrician

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाच्या वार्षिक सभेत मागणी

    फलटण : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ’दर्पण’ कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे त्यांची कर्मभूमी असलेल्या मुंबई येथील काळबादेवी भागात भव्य राष्ट्रीय स्मारक राज्य शासन व मुंबई महानगर पालिका यांनी उभारावे तसेच मुंबई विद्यापीठाचे विभाजन करून कोकणासाठी स्वतंत्र होणार्‍या विद्यापीठाला ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर कोकण विद्यापीठ’ असे नाव द्यावे, अशी मागणी करणारा विशेष ठराव महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या 36 व्या व महाराष्ट्र राज्य जिल्हा वृत्तपत्र संपादक सहकारी संघाच्या 40 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी या दोन्ही संस्थांचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ हे होते.

    नुकत्याच ऑनलाईन पद्धतीने संपन्न झालेल्या या दोन्ही संस्थांच्या वार्षिक सभेमध्ये, राज्य शासनाने या वर्षीच्या अर्थसंकल्पात आचार्य बाळशास्त्री जांभेकर जेष्ठ पत्रकार सन्मान योजनेसाठी 10 कोटींची तरतूद केली तसेच ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले या जन्मगावी संस्थेने उभारलेल्या स्मारकाच्या दुरूस्ती व सुशोभीकरणासाठी तसेच रस्ते विकासासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे एका विशेष ठरवान्वये  अभिनंदनही करण्यात आले. त्याला अनुसरून ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील सध्याच्या रुपये 11 हजार प्रती महिना मानधनात वाढ करून प्रत्येकी रुपये 20 हजार मानधन 1 एप्रिल 2021 पासून देण्यात यावे व त्यासाठी आणखी जादा रुपये 15 कोटींची तरतूद नजीकच्या पावसाळी अधिवेशनातील पूरक मागण्यांमध्ये करण्यात यावी. तसेच कोवीड-19 च्या काळात कोरोना विरुद्धच्या लढ्यात कोरोना योद्धे म्हणून कार्यरत असणार्‍या व निधन पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी रुपये 50 लाखांचे अर्थसाह्य देण्यात यावे, अशी मागणीही राज्य शासनाकडे या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून रवींद्र बेडकीहाळ यांनी केली आहे.

    कोरोना -19 च्या काळात आणि सध्याही अनेक निर्बंधांमुळे राज्य शासनाच्या शासनमान्य जाहिरात यादीवरील ’क’वर्गातील जिल्हा दैनिके, साप्ताहिके यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.त्यासाठी या वृत्तपत्रांना नुकसान भरपाई मदत म्हणून प्रत्येकी रुपये 3 लाखाचे पॅकेज जादा जाहिरातींची तरतूद करून द्यावी. तसेच राज्य शासनाच्या एक वर्ष पूर्ती निमित्त माहिती व जनसंपर्क विभागाने दिलेल्या मोठ्या प्रमाणावरील शासनाच्या व अन्य विभागांच्या जाहिराती फक्त ’अ’ वर्ग वृत्तपत्रांना व इलेक्ट्रॉनिक मीडियाला देण्यात आल्या होत्या. अशा जाहिराती ’क’ वर्गातील वृत्तपत्रांना देण्यात यावेत अशी मागणी एका ठरावाअन्वये या सभेत मंजूर करण्यात आली.

    महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी तर्फे कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके व महाराष्ट्र राज्य जिल्हा वृत्तपत्र संपादक सहकारी संघातर्फे कार्यलक्षी संचालक अमर शेंडे यांनी विषय पत्रिका वाचून 2019-2020 ची आर्थिक पत्रके व कार्य अहवाल सादर केला. विषय पत्रिकेवरील सर्व विषय खेळीमेळीच्या वातावरणात एकमताने मंजूर करण्यात आले. या सभेसाठी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, विश्‍वस्त गोविंद बेडकिहाळ, गजानन पारखे, सौ.अलका बेडकिहाळ, रोहित वाकडे, भारद्वाज बेडकिहाळ तसेच संपादक सहकारी संघाचे बाळासाहेब आंबेकर,  अ‍ॅड.रोहित अहिवळे, विनायक खाटपे, भाऊसाहेब नलावडे, प्रसन्न रुद्रभटे यांच्यासह दोन्ही संस्थांचे  पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

    विजय मांडके व अमर शेंडे यांनी आभार प्रदर्शन केले.

No comments