Breaking News

‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी ट्रॅकिंग-टेस्टिंगचे काम प्रभावीपणे करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Deputy Chief Minister Ajit Pawar has directed to carry out tracking and testing work effectively to prevent corona infection

पुण्यातील कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

    पुणे, दि. 10 : पुणे जिल्ह्यासाठी पुढील पंधरा दिवस अत्यंत महत्वाचे असून प्रत्येकाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गांभीर्याने काम करण्याची गरज असल्याचे सांगतानाच ट्रॅकिंग, टेस्टिंगचे काम प्रभावीपणे करा. बेड व्यवस्थापन तसेच रेमडेसिवरबाबत कडक धोरण राबवा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. आरोग्य सुविधा वाढविण्यासोबतच हॉटस्पॉटमधील बंधने पाळली जातील याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

    विधानभवन (कौन्सिल हॉल) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनाबाबत’ आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील टिंगरे, आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, सहपोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, पिंपरी-चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त संतोष पाटील, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके, डॉ. दिलीप मोहीते आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘कोरोना’ विषाणूची सद्यस्थिती व प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत, तसेच लसीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.

    उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरासह संपूर्ण जिल्ह्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नाला सर्वांचे पाठबळ महत्वाचे आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपचार तसेच सुविधांमध्ये सातत्याने वाढ करत राहा. तसेच महानगरासह ग्रामीण भागातही ऑक्सिजनयुक्त बेड कमी पडणार नाहीत, याकडे लक्ष द्या. तसेच हॉटस्पॉटमधील बंधने पाळली जातील याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. टास्क फोर्सने रेमडेसिवरबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करा. रेमडेसिवरच्या बाबतीत कडक धोरण राबवा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

    ट्रॅकिंग व टेस्टिंगचे काम प्रभावीपणे करण्याच्या सूचना देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन ज्या उपाययोजना सांगत आहे, त्याचे पालन करा. विनाकारण घराबाहेर बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर तात्काळ कार्यवाही करावी आणि लोक विनाकारण घराबाहेर पडणार नाहीत, याची काळजी घ्यावी. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत आरोग्य सुविधा उभारणीवर भर देण्याचेही निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.

    केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, पुणेकर नागरिकांनी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे. हा कालावधी कोरोना संसर्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठीची बंधने पाळली जावीत. चाचण्यांची क्षमता वाढविण्याची गरज असून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक संपर्क शोधून त्यांचे विलीगीकरण करणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या कामात स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. सर्व मिळून कोरोनाचा संसर्ग निश्चितपणे दूर करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली.

    डॉ. सुभाष साळुंके यांनी कोविड नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यादृष्टीने नियोजन सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

    विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ट्रॅकिंग व टेस्टिंग, कंटेनमेंट झोन, लसीकरण, रुग्णालयीन व्यवस्थापन, रुग्णसंख्येचा तपशील, पुणे ग्रामीण भागातील रुग्णवाहिका उपलब्धता, जम्बो कोविड रुग्णालय व्यवस्थापन, ऑक्सिजन मागणी, रेमडेसिवीर मागणी व सद्यस्थिती  तसेच पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची क्षेत्रनिहाय माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

    जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी ग्रामीण भागातील कोविड-19 ची सद्यस्थितीची माहिती देऊन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


No comments