Breaking News

पाईपलाईन फोडून पेट्रोल चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी केले जेरबंद

Police arrested a gang of petrol thieves who broke the pipeline

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण - हिंदुस्तान पेट्रोलीयम कार्पोरेशन ली. लोणी, पुणे या कंपनीची मुंबई ते सोलापूर जाणारी जमिनीअंतर्गत असणारी पेट्रोलियम पाईप लाईन मौजे सासवड तालुका फलटण गावच्या हद्दीत काळाखडक येथे, फोडून त्यामधील पेट्रोलची चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला लोणंद पोलिसांनी जेरबंद केले आहे. टोळीतील सात जणांना पोलिसांनी आज फलटण येथील न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी 12 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

    यामध्ये 5 जण पुणे जिल्हयातील तर 2 जण फलटण तालुक्यातील आहेत. या टोळीने पुणे, सांगली जिल्ह्यात अशाप्रकारे पेट्रोल चोरी केली असून संशयीत आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. या गुन्हयात आणखी आरोपी असण्याची शकयता असल्याची माहिती सातारा जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी लोणंद येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली.

     याबाबत लोणंद पोलीस स्टेशन यांचेवतीने देण्यात आलेली याबाबतची सविस्तर हकीकत अशी दि. 23 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 15.40 वाजण्याच्या सुमारास सासवड ता. फलटण गावचे हद्दीतून जमीनी खालुन जाणारी हिंदुस्तान पेट्रोलीयम कंपनीचो पेट्रोल पाईप लाईनला होल पाडून पेट्रोलची चोरी करण्याचा प्रयत्न केला असता त्यामधून सुमारे 2 हजार लिटर पेट्रोल शेजारचे ज्वारीचे शेतात पसरल्याने, जमीनीत मुरलेले पेट्रोल आजूबाजूचे विहीरीत उतरल्यामुळे आजूबाजूचे शेतक-यांचे शेतीचे नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या पेट्रोलचे 1 लाख 90 हजार रुपये असे बाजारभाव मुल्यांकन असल्याचे हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमीटेड या कंपनीचे सहाय्यक प्रबंधक विकी सत्यवान पिसे यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक, धिरज पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण तानाजी बरडे यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस अधिकारी विशाल के. वायकर यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकासोबत यातील सराईत आंतरराज्य टोळीतील 7 संशयित आरोपी निष्पन्न करुन त्यांना गुन्हे शाखा क्रमांक 2 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांचे मदतीने पिंपरी चिंचवड परिसरातुन शिताफीने सापळा रचुन ताब्यात घेवून इंट्रॉगेशन स्किलचा वापर करुन त्यांचेकडे केलेल्या तपासात यातील 7 ही संशयित आरोपीनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केला आहे. त्यांनी अशाप्रकारचे पेट्रोल चोरीसारखे गुन्हे महाराष्ट्रातील अनेक इतर जिल्हयामध्ये केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यामध्ये अनित हरीशंकर पाठक (वय 32 वर्ष रा.मुळ गाव पिंडराई पटखान जि.वाराणसी राज्य उत्तरप्रदेश सध्या रा. वाल्हेकरवाडी चिंचवड), बाळु आण्णा चौगुले (वय 42 वर्ष रा.रामनगर चिंचवड पुणे), मोतीराम शंकर पवार (वय 20 वर्षे रा.गवळीमाथा भोसरी पुणे), इस्माईल पिरमहंमद शेख (वय 62 वर्ष रा.डीमार्ट शेजारी पिपरी पुणे), शाम शिवाजी कानडी (वय 50 वर्षे रा. वाल्हेकरवाडी चिंचवड), दत्तात्रय सोपान लोखंडे (वय 41 वर्ष रा.सासवड ता.फलटण जि.सातारा), नामदेव ज्ञानदेव जाधव (वय 28 वर्ष रा. दालवडी ता. फलटण जि.सातारा) यांना अटक केली आहे.

    सदर 7 संशयित आरोपींना मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी फलटण यांचे न्यायालयात हजर केले असता त्यांना  दि.12 एप्रिल 2021 रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक गणेश माने अधिक तपास करीत आहेत.

    सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील यांचे सुचनेप्रमाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, गुन्हे प्रकटोकरण पथकाचे गो.ना.संतोष नाळे, पोलीस कॉन्स्टेबल श्रीनाथ कदम, सहाय्यक पोलीस फौजदार अंकुश इवरे, अनिल भोसले, शौकत सिकिलकर, पोलिस हवालदार महेंद्र सपकाळ, संजय जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश शिंदे, सागर धेंडे, अभिजित घनवट, विठ्ठल काळे, नाना होले, ज्ञानदेव साबळे, शशिकांत ग्रडे, शिवाजी सावंत, चालक विजय शिंदे यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला आहे.

    सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील यांचे सुचनेप्रमाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी लोणंद पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

No comments