जगातला सर्वात उंच असलेल्या चिनाब नदीवरील पुलाच्या कमानीचे काम पूर्णत्वाला
नवी दिल्ली,- उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला (युएसबीआरएल) रेल्वे जोड प्रकल्पाचा भाग असलेल्या आणि जगातला सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब नदीवरील पुलाच्या पोलादी कमानीचे काम पूर्णत्वाला नेऊन बांधकाम क्षेत्रातला महत्वाचा टप्पा गाठला आहे. चिनाब नदीवरच्या पुलाच्या बांधकामातला हा सर्वात अवघड टप्पा होता. कटरा ते बनिहाल दरम्यानच्या 111 किमी लांबीचा टप्पा पूर्ण करण्याच्या दिशेने ही मोठी झेप आहे. रेल्वेच्या इतिहासात नुकत्याच झालेल्या रेल्वे प्रकल्पांपैकी स्थापत्त्य अभियांत्रिकी दृष्टीकोनातून सर्वात मोठे आव्हान असलेला हा एक प्रकल्प आहे. 5.6 मीटर लांबीचा धातूचा शेवटचा तुकडा सर्वोच्च टोकाला बसवण्यात आला असून नदीच्या काठाच्या दोन बाजूला असलेल्या भागांना तो जोडण्यात आला. यामुळे 359 मीटर खालून वाहणाऱ्या धोकादायक अशा चिनाब नदीवर कमानीचा आकार पूर्ण झाला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर आधारासाठीच्या केबल हटवणे, कमानीच्या सांगाड्यात कॉन्क्रीट भरणे,पुलाचा पोलादी त्रिकोणी आधार उभारणे, रूळ बसवणे यासारखी कामे हाती घेण्यात येतील.
रेल्वे मंत्री पियुष गोयल, रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सुनीत शर्मा, उत्तर रेल्वेचे महा संचालक आशुतोष गांगल यांनी हे ऐतिहासिक काम पूर्णत्वाला जाताना दूर दृश्य प्रणाली द्वारे पाहिले.
चिनाब नदीवरील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा पुला संदर्भातल्या ठळक बाबी-
- काश्मीर खोऱ्याला देशाच्या उर्वरित भागाला जोडणाऱ्या युएसबीआरएल प्रकल्पाचा एक भाग म्हणून भारतीय रेल्वे हा कमानीच्या आकाराचा पूल चिनाब नदीवर बांधत आहे.
- हा पूल 1315 मीटर लांबीचा आहे.
- नदी पात्रापासून 359 मीटर इतक्या उंचीवरचा जगातला हा सर्वात उंच पूल आहे.
- फ्रान्स मधल्या आयफेल टाँवरपेक्षा याची उंची 35 मीटरने जास्त आहे.
- कमानी मध्ये स्टीलचे ठोकळे असून भक्कमपणासाठी त्यामध्ये कॉक्रीट भरण्यात येईल.
- कमानीचे वजन 10,619 मेट्रिक टन आहे.
- ओव्हरहेड केबल क्रेनद्वारे कमानीचे भाग बसवण्याचे काम भारतीय रेल्वेने प्रथमच केले आहे.
- बांधकामातल्या बारकाव्यासाठी अतिशय अद्ययावत ‘टेकला’ सॉफ्टवेअरचा उपयोग करण्यात आला.
- या पुलाच्या बांधणीसाठी 1486 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
- कोकण रेल्वे महामंडळ या बांधकामासंदर्भात अंमलबजावणी करत आहे.
- पुलाची लांबी 1.315 किलोमीटर आहे.
- या पुलाचे बांधकाम 120 वर्षे टिकेल.
- ताशी 266 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यालाही हा पूल तोंड देऊ शकणार आहे.
- विआडक्ट आणि पायासाठी फिनलंडच्या डब्ल्यूएसपी मेसर्सचे सहकार्य घेण्यात आले आहे.
- कमानीसाठी जर्मनीच्या कंपनीचे सहकार्य घेण्यात आले आहे.
- पाया सुरक्षित राखण्यासाठी बंगलोरची भारतीय विज्ञान संस्था काम करत आहे.
आगळी वैशिष्ट्ये –
- ताशी 266 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यालाही हा पूल तोंड देऊ शकेल.
- संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेशी सल्ला मसलत करून भारतात प्रथमच पूल निर्मिती करण्यात येत आहे.
- कमानीचे काम सुरु केल्यापासून ते पूर्ण करेपर्यंत कमानीला स्टे केबलचा आधार देण्यात आला.
- कमानीचे काम पूर्णत्वाला नेण्यासाठीच्या प्रक्रियेची सुरवात 20 फेब्रुवारी 2021 ला झाली.
No comments