Breaking News

कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी कडक निर्बंध आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Strict restrictions are needed for some time to stop Covid's vicious cycle - Chief Minister Uddhav Thackeray

सर्व पक्षांनी एकमुखाने शासनाच्या निर्णयांना सहकार्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

    मुंबई -  कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल आणि झपाट्याने वाढणारा संसर्ग थोपवायचा असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील, विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या सूचनांचाही निश्चितपणे विचार केला जाईल. मात्र सर्व पक्षांनी एकमुखाने याबाबतीत राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांना सहकार्य करावे व लोकांमध्ये जागृती निर्माण करावी. ही लढाई कोरोनाने आपल्यावर लादलेली असून लोकांच्या जीवाला पहिले प्राधान्य द्यावेच लागेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

    राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

    या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे-पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील आदींनी सहभाग घेऊन आपल्या सूचना मांडल्या.

    प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी कोविड परिस्थिती आणि निर्माण झालेल्या आव्हानाला शासन कसे तोंड देत आहे त्याची माहिती दिली.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले, कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे.  विरोधी पक्षनेत्यांनी दिलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार  केला जाईल, त्यांनी चांगल्या सूचना मांडल्या आहेत. विशेषत: रेमडेसिव्हीर उपलब्धता, चाचण्यांचे रिपोर्ट लवकर मिळणे, प्रयोगशाळाना यासाठी सूचना देणे, ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून काटेकोर नियोजन अशा त्यांच्या सूचनांवर शासन कार्यवाही करेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

    आपण सर्वसमावेषक नियोजन करू तसेच सर्व घटकांचा यात विचारही करू पण आता या क्षणी वेगाने वाढणारी रुग्णवाढ थांबवायची कशी हा प्रश्न आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लोक घरी होते. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे सोपे होते. आता जेव्हा की सर्व खुले झाले आहे तेव्हा यात व्यावहारिक अडचणी येतात ते केंद्राने समजून घ्यावे.

हातावर पोट असणाऱ्या वर्गाची सगळ्यांनाच चिंता

    मुख्यमंत्री म्हणाले, एकीकडे लसीकरण वाढविण्याची खूप गरज आहे. यूकेने दोन महिने आधीच कडक लॉकडाऊन केला पण त्या काळात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवून नागरिकांना संरक्षित केले. आज युवा पिढीला लस देण्याची गरज आहे. फायझर कंपनी तर १२ ते १५ वयोगटातील मुलांना लस देण्याचे नियोजन करतेय. कडक निर्बंध लावताना गरीब, श्रमिक, हातावर पोट असणाऱ्या वर्गाला त्रास होऊ नये ही सर्वांचीच  भूमिका आहे. त्यादृष्टीने जरुर विचार झाला पाहिजे आणि केला जाईल पण दररोज झपाट्याने वाढणारा संसर्ग आणि रुग्णवाढ काहीही करून प्रथम रोखणे अतिशय गरजेचे आहे.

    सर्वानुमते एकमुखाने निर्णय घेऊन या संकटावर मात कशी करावी ते ठरविले पाहिजे. यासाठी लोकांमध्ये आपण सर्व पक्षांनी जागृती केली पाहिजे. रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढते आहे की, आज आपण लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवेल. कोरोना सर्वानांच टार्गेट करीत आहे. त्यात सगळे आले. हातावर पोट असलेला वर्ग सगळ्या विभागांत आणि क्षेत्रात आहे त्यामुळे विचार करायचा तर सगळ्यांचाच करावा लागतो. आज परिस्थिती बिकट बनत चालली आहे. टास्क फोर्सच्या तज्ञांचे म्हणणेदेखील आम्ही सातत्याने विचारात घेत आहोत. एका बाजूला जनभावना आहे पण दुसऱ्या बाजूला कोरोनाचा उद्रेक आहे , अशा परिस्थितीत ही लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ तर काढावीच लागेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    मी गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रातील लोकांशी बोलतो आहे, काल मी खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी पण बोललो. राज्य शासनाला सहकार्य करण्याची सगळ्यांची तयारी आहे. सर्व पक्षीय नेत्यांना माझे आवाहन आहे की राज्यातील जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन जो काही निर्णय घेतला जाईल त्याला आपले सहकार्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

    यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सूचना मांडल्या. रेमडेसिवीर उपलब्धता, ऑक्सिजन नियोजन, लॉकडाऊन लावण्यापूर्वी संतुलित भूमिका घेणे आदी विषय त्यांनी मांडले.

    यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी कडक पावले उचलावी लागतील तसेच या औषधाचा अतिरेकही थांबवावा लागेल.

    आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्येक नगरपरिषद व पालिकेकडे लिक्विड ऑक्सिजन साठा टँक उभारण्यासाठी आवश्यक तो निधी देऊन तात्काळ कार्यवाही करावी असे सुचविले.

    नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ऑक्सिजन कमतरता वाढल्याने प्रश्न उद्भवले असून कडक निर्बंध लावून रुग्ण वाढ रोखावी असे सांगितले.

    सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, तसेच आमदार नाना पटोले, प्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास. डॉ तात्याराव लहाने यांनीदेखील विचार मांडले.

No comments