Breaking News

रेमडेसिवीरचा काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घ्या - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

Take care that there will be no black market of Remdesivir - Urban Development Minister Eknath Shinde

रुग्णवाढीचा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे तसेच गृह विलगीकरणातील रुग्णांवर विशेष लक्ष देण्याचेही निर्देश

    मुंबई   – कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच रेमडेसिवीरची मागणीही वाढत आहे. त्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होऊन या औषधाचा काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, मंगळवारी दिले. तसेच, कोरोना रुग्णवाढीचा दर ५ टक्क्यांपेक्षा कमी राहील यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, गृह विलगीकरणात असलेले रुग्ण घरातच राहावेत याची काळजी घ्यावी आणि त्यासाठी आवश्यकता भासल्यास संबंधित सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांना विशेष पोलिस अधिकारी म्हणून तात्पुरते अधिकार द्यावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

    कोकण, पुणे तसेच नागपूर विभागातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिकांचे  आयुक्त, तसेच नगर परिषदा आणि नगर पंचायतींचे मुख्याधिकारी यांची कोरोनाविषयक आढावा बैठक मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. यावेळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक उपस्थित होते.

    श्री. शिंदे म्हणाले, कोरोना रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढू नये यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या हातावर शिक्का मारणे, त्यांच्या घरावर स्टीकर लावणे, परिसरात बॅनर लावणे, कंटेन्मेंट झोनमध्ये बाहेरील व्यक्ती जाणार नाही याची काळजी घेणे, रुग्णांशी नियमितपणे संपर्क साधून माहिती घेण्यासाठी कॉलसेंटर कार्यान्वित करणे आदी उपाययोजना आखण्याचे निर्देश त्यांनी दिले. मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, सहव्याधी असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करावेत, कोरोना उपचार केंद्रांत महिला रुग्णांची विशेष काळजी घ्यावी, कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी, उपचारांचा व इतर सुविधांचा दर्जा चांगला राहील यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः भेट द्यावी, उन्हाळा सुरू झाल्याने पुरेशा प्रमाणात पंखे, एअर कुलर द्यावेत, शॉर्ट सर्किट होणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देशही श्री. शिंदे यांनी दिले.

    रक्ताचा पुरवठा नियमितपणे व्हावा यासाठी विविध स्वयंसेवी संस्था व राजकीय पक्ष, पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. गर्दीचे नियमन करावे, मास्क परिधान करण्यासाठी विशेष मोहिम राबवावी, रिक्त पदे त्वरित भरावीत, अशा विविध सूचनाही त्यांनी दिल्या.

    ज्या महापालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींना निधीची गरज आहे, त्यांनी प्रस्ताव पाठवावेत. त्यांना डीपीडिसी आणि एसडीआरएफ मधून निधी देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निधी मंजूर करण्यात येईल, तसेच नगरविकास विभागाच्या माध्यमातूनही निधी दिला जाईल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

    कोविडवर मात करण्यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना आखाव्यात, त्यासाठी निधीची समस्या उद्भवणार नाही याची काळजी घेतली जाईल. मात्र कोरोना रुग्णांना कोणत्याही असुविधेला तोंड द्यावे लागणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी, सर्वांनी एकत्रितपणे कोविडविरोधातील युद्ध जिंकू, असा आत्मविश्वास श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

No comments