कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठ स्थापणार
मंत्रिमंडळ निर्णय
Cabinet decision - Karmaveer Bhaurao Patil Group University will be established
मंत्रिमंडळ निर्णय : दि. 5 मे 2021 - सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे समूह विद्यापीठ स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने, समूह विद्यापीठ निर्माण करणे शक्य व्हावे यासाठी, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, राज्यभरातील उच्च शैक्षणिक संस्था अंतरनिहाय विखुरण्यामधील मोठी तफावत दूर करण्याकरिता समूह विद्यापीठे स्थापन करण्याची तरतूद केलेली आहे.
ज्या महाविद्यालयांकडे पुरेशा शैक्षणिक, भौतिक व तांत्रिक पायाभूत सोयीसुविधा आहेत अशा 3 ते 5 विद्यमान महाविद्यालयांची संसाधने एकत्रित करुन, ही विद्यापीठे निर्माण करण्याकरिता तसेच विद्यापीठाचे विविध दर्जात्मक मापदंड मोठ्या प्रमाणात दर्शवून गुणवत्तेचा दर्जा राखण्यात समर्थ असलेल्या महाविद्यालयांचा समावेश करण्यात येईल.
राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत यशवंतराव चव्हाण विज्ञान संस्था, सातारा (स्वायत्त) हे मुख्य महाविद्यालय व धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा (स्वायत्त) आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा (स्वायत्त) ही दोन सहभागी महाविद्यालये या तीन अनुदानीत महाविद्यालयांचा समावेश असलेले “कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा” हे समूह विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली.
No comments