लहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे
Considering the incidence of corona infection in children, a task force of pediatricians will be formed immediately in the state - Health Minister Rajesh Tope
मुंबई, दि. ७ : कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत असून तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आरोग्यमंत्री बोलत होते. त्यांच्या संवादातील प्रमुख मुद्दे असे:
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला जात आहे. अशातच तिसऱ्या लाटेची देखील पूर्वसूचना मिळाली आहे. हा धोका लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी शासनाने पावले उचलली आहेत.
विशेष करून लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या उपचारासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने केला जाईल,असे श्री. टोपे यांनी सांगितले. या माध्यमातून लहान मुलांची काळजी आणि उपचार घेण्यासाठी टास्क फोर्स काम करेल.
रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे,बालकांसाठीचे व्हेंटीलेटर्स, एनआयसीयुमधील बेडस् यांची तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. मुख्यमंत्री महोदयांनी देखील गुरूवारी रात्री दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून विविध बालरोग तज्ज्ञांशी संवाद साधला.
महाराष्ट्र लसीकरणात देशात आघाडीवर आहे.१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी पुरेशी लस उपलब्ध नसल्याने लसीकरणाला म्हणावा तसा वेग आला नाहीये. या वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्राधान्याने लस देण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करणार असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात रशियातील स्पुटनिक लस उपलब्ध व्हावी यासाठी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) यांच्याशी या लसीच्या दराबाबत बोलणी सुरू आहे.
जागतिक निविदेच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर खरेदी करायची आहे. या यंत्राच्या तांत्रिक बाबी तपासणीसाठी तीन डॉक्टरांची समिती नेमण्यात आली आहे. त्याचबरोबर 3 लाख रेमडेसिवीर इंजेक्शन आयातीसाठी डीसीजीआयच्या मान्यतेने खरेदीसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत.
No comments