Breaking News

‘कोरोना’ विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफचे योगदान महत्त्वपूर्ण – उपमुख्यमंत्री अजित पवार

Contribution of doctors, nurses, paramedical staff important in the fight against 'Corona' - Deputy Chief Minister Ajit Pawar

    पुणे  : ‘कोरोना’ विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफसह पहिल्या फळीतील कोरोना योद्ध्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. ‘कोरोना’ संसर्गाच्या वाढत्या काळात वारजे-माळवाडी येथील कोविड सेंटरच्या माध्यमातून या भागातील ‘कोरोना’च्या रुग्णांना चांगली आरोग्य सेवा-सुविधा मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

वारजे-माळवाडी येथे नगरसेवक सचिन दोडके यांच्या पुढाकारातून सुरु झालेल्या 101 बेड क्षमतेच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज कोविड सेंटर’चे ऑनलाईन उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुनील टिंगरे, आमदार अशोक पवार, आमदार सुनील शेळके, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त संतोष पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, नगरसेवक सचिन दोडके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे डॉक्टर व वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी उपस्थित होते.

    उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘कोरोना’ बाधित रुग्णांना आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व यंत्रणांना युद्ध पातळीवर काम करावे लागणार आहे. कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर भर देण्यात येत आहे. नगरसेवक सचिन दोडके यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून वारजेसह आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांना तात्काळ उपचार मिळण्यास मदत होईल. या सेंटरमुळे वारजे माळवाडीसह या परिसरातील रुग्णांना चांगली वैद्यकीय सुविधा व दिलासा मिळेल, असे सांगून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाल्यावर या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड व्यवस्था होण्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

    उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच हात धुणे, सॅनिटायझरचा वापर, मास्क वापरणे आवश्यक असून कोरोनाची लक्षणे जाणवल्यास तातडीने तपासणी करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोविड सेंटरची सविस्तर माहिती घेतली. तसेच कोविड सेंटर सुरु झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

No comments