तोक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन तात्काळ मदत करा – आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे निर्देश
Disaster Management Minister Vijay Vadettiwar directs immediate help by conducting immediate inquiries into the damage caused by Tokte
मुंबई - तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, खंडित झालेला वीज पुरवठा त्वरित सुरळीत करा तसेच पुढील पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन पडझड झालेल्या घरांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.
अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. वडेट्टीवार बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता आणि मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसेच विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री.वडेट्टीवार म्हणाले, गेल्या दोन-तीन दिवसांपासून तोक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई जिल्ह्याला जोरदार फटका बसला आहे. तुफानी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फळबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. घरांचे पत्रे उडून गेले आहेत तर अनेक घरांच्या भिंती पडून मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचा मुख्य स्रोत असलेल्या फळ बागांचे नुकसान झाले आहे तसेच मच्छिमारांच्या बोटींचेही नुकसान झाल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. कोरोनामुळे आधीच संकटाचा सामना करत असलेल्या जनतेला या तोक्ते वादळाचा फटका बसून मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीचा स्थानिक प्रशासनाने गांभीर्याने विचार करुन लवकरात लवकर मदतकार्य सुरू करावे.
चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे, सर्व नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत करणाऱ्यांसाठी नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करण्यात यावेत. वीज, रस्ते, पाणीपुरवठा योजना यांची दुरुस्ती युद्ध पातळीवर करण्यात यावी. तसेच पुढील पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता ज्या लोकांच्या घराचे नुकसान झाले आहे त्याची दुरुस्ती लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्तांना अन्न धान्य केरोसिन व जीवनावश्यक साहित्याची तत्काळ मदत करा, असे निर्देश श्री.वडेट्टीवार यांनी दिले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘ब्रेक द चेन’ च्या कडक निर्बंधातही चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी हार्डवेअरची दुकाने पूर्ण वेळ सुरू ठेवण्यात येतील. नुकसानग्रस्तांना मदत जाहीर करण्यासाठी नुकसानीचा प्राथमिक अंदाज लगेच सादर करण्याचे निर्देशही श्री.वडेट्टीवार यांनी यावेळी दिले.
कोकणात येणाऱ्या विविध चक्रीवादळामुळे येथील वीजवाहिन्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे या वीजवाहिन्या भूमिगत करण्याबाबत राज्य शासनाचा विचार असल्याचे सांगून तसे सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे आदेश श्री.वडेट्टीवार यांनी दिले.
नुकसानग्रस्त भागाचा लवकरच दौरा करण्यात येणार आहे. झालेल्या नुकसानीच्या अंदाजित निधीबाबत आणि केद्र शासनाच्या मदतीसाठी केंद्रीय पथकाला पाठविण्यासाठी केंद्र शासनाला तात्काळ पत्रव्यवहार करण्याच्या सूचनाही विभागाच्या अधिकाऱ्यांना श्री.वडेट्टीवार यांनी केल्या.
यावेळी विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता यांनी नुकसानीची प्राथमिक माहिती दिली तसेच संबंधित जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली.
No comments