गाव पातळीवर कोव्हीड सेंटर सुरू केली तर निश्चित आपण यातून बाहेर पडू - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. २१ मे २०२१ - नागरिकांनी कोरोनाची थोडीशी जरी लक्षणे दिसली, तरी डॉक्टरकडे जाणे गरजेचे आहे, तर आपण त्यावर योग्य उपचार करू शकतोय. ग्रामीण भागामध्ये गृह विलीगीकरणाची सोय नसल्याने, नियम पाळणे शक्य होत नाहीत. परंतु कोव्हीड केअर सेंटर आपण जर व्यवस्थित करून घेतली आणि गाव पातळीवर जर कोव्हीड सेंटर सुरू केली गेली तर निश्चित आपण यातून बाहेर पडू असा विश्वास विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
साठे ता. फलटण येथील कोरोना केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर निंबाळकर व इतर |
पुढे बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले की, कोव्हीड मधून बाहेर पडल्यानंतर रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व त्यानंतर दुसरे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते, तरी नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. त्याच्यावर औषध उपचार आहेत, परंतु ती औषधे महाग आहेत. त्यादृष्टीने माझे कार्य चालू आहे. सध्या माझ्या डोळ्यापुढे दोन गोष्टी आहेत, पहिली कोव्हीड आणि कोव्हीडला लागणारी औषधे व ऑक्सिजन आणि दुसरी कोव्हीड नंतर जे डोळ्याचे इन्फेक्शन (काळी बुरशी) निघालेले आहे, त्याच्या दृष्टीने आपल्याला सामना करण्यासाठी जी औषधे लागतील, जरी ती महाग असली, तरी ती कशी स्वस्त करता येतील, त्या दृष्टीने काम चालू असल्याचे श्रीमंत रामराजे यांनी सांगितले.
No comments