लसीचे दोन्ही डोस सर्वाधिक नागरिकांना देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम
Maharashtra is the first state to give the highest dose of vaccine to its citizens
मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात केवळ लसीचे सर्वाधिक डोस देण्यात महाराष्ट्र अव्वल नाही तर राज्यातील २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही डोस देऊन त्यांना संरक्षित करण्याकामीही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. आजपर्यंत लसीकरण मोहिमेत १ कोटी ६७ लाख ८१ हजार ७१९ डोस देण्यात आले आहेत.
दरम्यान, काल ५ मे रोजी महाराष्ट्रात १५८६ लसीकरण केंद्रांद्वारे एकूण २ लाख ५९ हजार ६८५ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील १ लाख ५३ हजार ९६७ नागरिकांचा समावेश आहे.
राज्यामध्ये आतापर्यंत १ कोटी ३९ लाख १५ हजार ८८ नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला तर २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून सर्वाधिक नागरिकांना दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्येही महाराष्ट्र पहिला असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
महाराष्ट्राने लसीकरणात सुरूवातीपासूनच आघाडी घेतली आहे. त्याच बरोबर लस वाया जाण्याचे महाराष्ट्राचे प्रमाण केवळ १ टक्के आहे. लसीचा योग्य वापर करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी वेळोवेळी अभिनंदनही केले आहे.
महाराष्ट्र पाठोपाठ राजस्थान (१ कोटी ३५ लाख ९७ हजार), गुजरात (१ कोटी ३२ लाख ३१ हजार), पश्चिम बंगाल (१ कोटी १४ लाख ७५ हजार), कर्नाटक (१ कोटी १ लाख ११ हजार) इतके लसीकरण झाले आहे.
No comments