महाराष्ट्राला ऑक्सिजनचा २०० मेट्रीक टन वाढीव पुरवठा करावा– मुख्य सचिवांची केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांकडे मागणी
Maharashtra should get additional supply of 200 metric tonnes of oxygen - Chief Secretary demands from Union Cabinet Secretary
मुंबई, दि. ४ : महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देत असून राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची देखील आवश्यकता भासत आहे. त्यामुळे राज्यात ऑक्सिजन मागणी वाढत असून केंद्र शासनाकडून सध्या होत असलेल्या पुरवठ्यात २०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा वाढीव पुरवठा करण्यात यावा. लिक्विड ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी १० टॅंकर्स महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना पत्र पाठवून केली आहे.
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने ऑक्सिजन, रेमडेसीवीर, रुग्ण शय्या यांचा आढावा घेतला जात आहे. राज्याला वाढीव ऑक्सिजनची गरज असून त्याबाबत केंद्र शासनाकडे मागणी करण्याबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मुख्य सचिवांना निर्देश दिले होते. त्यानुसार मुख्य सचिव श्री. कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांना पत्र पाठवले आहे.
राज्यात सध्या ६ लाख ६३ हजार ७५८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ७८ हजार ८८४ रुग्ण ऑक्सिजनवर असून २४ हजार ७८७ रुग्णअतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. राज्यातील पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नंदूरबार, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या १६ जिल्ह्यांमध्ये सातत्याने सक्रिय रुग्ण संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनच्या मागणीतही वाढ होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन ऑडीट केले जात असल्याचे मुख्य सचिवांनी या पत्रात म्हटले आहे.
राज्यात ऑक्सिजनची वाढती मागणी आणि गरज लक्षात घेता सध्या केंद्र शासनाकडून होत असलेल्या ऑक्सिजन पुरवठ्यात २०० मेट्रीक टनांची वाढ करण्यात यावी. ऑक्सिजन लिफ्टींगची सुविधा राज्याच्या सोयीची असावी. यापूर्वी नेमून दिलेले ओडीशा येथील आरआयएनएल, विझाग आणि जिंदाल स्टिल येथील ऑक्सिजन उपलब्धतेचे नियोजन कागदावर राहिलेले आहे.
सध्या गुजरात जामनगर येथून दिवसाला १२५ मेट्रीक ऑक्सिजन पुरवठा होत असून त्यात १०० मेट्रीक टनाने वाढ करून दिवसाला २२५ मेट्रीक टन आणि भिलाई येथून २३० मेट्रीक टन पुरवठा व्हावा, अशी विनंतीही मुख्य सचिवांनी केली आहे. भौगोलिकदृष्ट्या ही दोन्ही ठिकाणे महाराष्ट्राच्या जवळ असून त्यामुळे वाहतुकीचा कलावधी कमी होण्यास मदत होतानाच रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन देण्यासाठी मदत होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
लिक्विड ऑक्सिजन वाहतुकीसाठी सिंगापूर, दुबई व अन्य देशांतील तेल उत्पादक कंपन्यांकडून केंद्र शासनाला आयएसओ टॅंकर्स मिळाले आहेत. त्यातील किमान १० टॅंकर्स महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून ओडीशातील अंगुल येथून रोरो सेवेच्या माध्यमातून लिक्विड ऑक्सिजन आणणे सोपे होईल, असेही मुख्य सचिवांनी या पत्रात म्हटले आहे.
No comments