राज्यात कोविडसाठी पर्यायी उपचार पद्धती राबविण्याबाबत चाचपणी करण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
मुंबई : दुसऱ्या लाटेत राज्यात कोविडचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आयुषच्या पर्यायी उपचारपद्धती राबविण्याबाबत चाचपणी करण्यात यावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले. श्री.देशमुख यांच्या उपस्थितीत आज आयुष टास्कफोर्सच्या सदस्यांची ऑनलाइन बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले की, गेल्या जवळपास वर्षभरापासून अधिक काळ कोविड संकटाशी आपण सामना करत असून अजूनही रुग्णसंख्या आटोक्यात आलेली नाही. वाढत्या कोविड रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टर्स कमी पडत आहेत हे लक्षात घेऊन या कामी राज्यात सध्या उपलब्ध असलेल्या अडीच लाख आयुष डॉक्टरांचा उपयोग चांगल्या पद्धतीने कसा करून घेता येईल याबाबत विचार करण्यात यावा अशी सूचनाही त्यांनी केली.
कोविड रुग्णांची संख्या तातडीने कमी करणे आवश्यक आहे. कोविडची सौम्य लक्षणे असणाऱ्यांना आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी अशा पर्यायी उपचार पद्धती देता येऊ शकतात. त्यासाठी आदर्श नियमावली (एस.ओ.पी) तयार करण्याचे काम आयुष संचालनालयामार्फत तातडीने करण्यात यावे, असेही श्री.देशमुख यांनी सूचित केले.
कोविडची लागण होऊ नये यासाठी त्याचप्रमाणे कोविड बाधित रुग्णांसाठीही प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या अनेक औषधांना केंद्रीय आयुष मंत्रालयाने मान्यता दिली आहे तसेच अशा प्रकारची अनेक चांगली औषधे मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत ही औषधे लवकरात लवकर कशी उपलब्ध करून देता येतील याबाबतही प्रयत्न करण्याचे यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.
सध्या दिल्ली आणि जयपूरमध्ये कोविडसाठी आयुर्वेद उपचाराला मान्यता देण्यात आली असल्याने हाच पॅटर्न महाराष्ट्रातही राबविण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करण्यात येईल. यामुळे आयुष डॉक्टरांचे मोठे संख्याबळ उपलब्ध होणार आहे. आयुष अंतर्गत येणाऱ्या पॅथींना उपचारांसाठी परवानगी द्यावी असे केंद्र शासनाकडे आयुष संचालनायामार्फत पत्र देण्यात येईल, असेही श्री.देशमुख यांनी सांगितले.
श्री.देशमुख म्हणाले की, कोविडसाठी उपचार पद्धती निरनिराळ्या असून ऍलोपॅथी यामध्ये प्रमुख भूमिका निभावत असली तरी अल्टरनेटीव्ह थेरपी निरनिराळ्या असू शकतात. आयुष संचालनालयांतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या पॅथींच्या डॉक्टरांनी या क्षेत्रात चांगले काम आणि संशोधन केलेले आहे. त्यामुळे आपल्या संशोधनाच्या कामाचा, ज्ञानाचा उपयोग या काळात करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. येत्या काळात होमिओपॅथिक आयुर्वेदिक, औषधे यांना मान्यता देताना त्यांनी मानके परिपूर्ण केली आहेत का हे तपासून घेणे आवश्यक आहे.
या बैठकीस वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने, आयुष संचालक डॉ.कुलदीप राज कोहली, डॉ. झुबैर शेख, डॉ. मनीष पाटील, डॉ. जवाहर शाह, डॉ. शुभा राऊळ, डॉ. उर्मिला पिटकर,
डॉ. उदय कुलकर्णी, डॉ. मनोज राजा, डॉ. जसवंत पाटील, डॉ. राजश्री कटके, डॉ. संजय लोंढे, डॉ. अमित दवे, डॉ. राजेंद्र निरगुडे, डॉ. नवीन पावस्कर, डॉ. पुरुषोत्तम लोहिया, डॉ. हरीश बी सिंग, जयंत वकनाली आदी उपस्थित होते.
No comments