पोलिसांनी स्वत:च्या आरोग्य सुरक्षेसह कायदा सुव्यवस्था राखावी – गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई
औरंगाबाद (जिमाका) :- कोरोनाच्या संकटात पोलीस यंत्रणा ही आरोग्य यंत्रणेसह दिवसरात्र काम करत असून स्वत:च्या आरोग्य सुरक्षेसह पोलिसांनी कायदा सुव्यवस्था चोखरित्या राखावी असे निर्देश शंभूराजे देसाई , राज्यमंत्री, गृह (ग्रामीण) वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता,पणन यांनी आज येथे दिले.
पोलीस अधीक्षक कार्यालय औरंगाबाद ग्रामीण येथे आयोजित जिल्हास्तरीय कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना,कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत गृह राज्यमंत्री श्री.देसाई बोलत होतेृ यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक के.मल्लिकार्जून प्रसन्ना, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी ,संबंधित पोलीस अधिकारी उपस्थित होते.
गृह राज्यमंत्री श्री.देसाई यांनी यावेळी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाच्या परिस्थितीबाबत आढावा घेऊन ग्रामीण परिसरातील संसर्ग रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच दुसऱ्या लाटेत आता ग्रामीण भागातील संसर्गाचे प्रमाण वाढलेले असून त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत संचारबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खबदारीपूर्वक काम करण्याचे सूचित केले. तसेच पोलिसांच्या त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य उपचार सुविधांची विशेष काळजी घेण्यात यावी. ऑक्सिजन साठा, औषधी, खाटांची उपलब्धता पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात तसेच पोलीस वसाहती अधिक सुविधांयुक्त करण्यासाठीच्या बाबींची पूर्तताही प्राधान्याने करावी, अशा सूचना यावेळी श्री.देसाई यांनी दिल्या.तसेच महिला बिट अंमलदार यांना प्रोत्साहित करून विशेष प्रशिक्षण देऊन पहिल्यांदाच त्यांना फिल्ड वर्क तसेच गुन्हे तपास करण्याची संधी उपलब्ध करून दिल्या बाबत श्री.देसाई यांनी आनंद व्यक्त केला आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक के.मल्लिकार्जून प्रसन्ना यांनी कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवण्याच्या दृष्टीने आंतरजिल्हा चेकपोस्टवर पोलीस यंत्रणेमार्फत राबवण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. त्याचप्रमाणे औरंगाबाद विभागात महिला पोलिसांनी बीट अंमलदार म्हणून जबाबदारी पार पाडण्यासाठी विशेष प्रोत्साहन देण्यात येत असून या उपक्रमाबाबतची माहिती श्री.प्रसन्ना यांनी यवेळी दिली.
पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात यशस्वीरित्या रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेद्वारा राबवण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच आता दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील संसर्ग रोखण्यासाठी 6 कन्टेंनमेंट झोनमध्ये तालुक्यांच्या नाकाबंदी, चेकपोस्टवर नेमण्यात आलेल्या बंदोबस्ताबाबत माहिती दिली. तसेच कोविड सेंटर, ऑक्सिजन प्रकल्प याठिकाणीही पुरेसा बंदोबस्त ग्रामीण पोलिसांमार्फत नेमण्यात आलेला असून ग्रामीण जिल्हा कार्यक्षेत्रात दि.21 ते 30 एप्रिल 2021 दरम्यान एकूण 38 ऑक्सिजन टँकरची वाहतूक झाली आहे. त्यांना पुरेसा बंदोबस्त नेमूण ग्रीन कॉरिडॉर पोलिसांमार्फत उपलब्ध करुन देण्यात आला असून या वाहतूकीत कोणताही अडथळा होणार नाही याची पूरेशी दक्षता घेण्यात आलेली असल्याचे श्रीमती पाटील यांनी सांगितले. तसेच 23 पोलीस स्टेशन अंतर्गत आजपावेतो 67 रुट मार्चचे आयोजन करण्यात आले असून संचारबंदीच्या वेळेत ग्रामीण जिल्ह्यांर्तगत बाजार, प्रतिबंधित आस्थापना सुरू असल्यास त्यांचेवर कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने 6 भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हयास लागुन असलेल्या 07 ही सिमा हया सिल(बंद) करण्यात आलेल्या असुन याठिकाणी कसुन चौकशी करण्यात येवुन विना पास कोणालाही जिल्हयात प्रवेश निषिध्द करण्यात आला आहे. याचप्रमाणे ग्रामस्तरावर पोलीसांची महत्वाचे चौकात, मार्केट, भाजी-पाला मंडी, याठिकाणी वारंवार पोलीसांची वाहने पेट्रालिंग करित आहेत तर गल्ली व अरुंद रस्त्यावर पायी पेट्रालिंग करण्यात येत आहे. चेकपोस्टवर विनाकारण ये-जा करणारे तसेच विना मासक असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पेट्रोलिंगसाठी ड्रोन कॅमेराचा वापर करण्यात येत असल्याचे सांगून श्रीमती पाटील यांनी पोलिसांना काम करतांना संसर्गापासून बचाव करण्याच्या दृष्टीने सर्व प्रतिबंधात्मक पूरक साधन सामुग्री, मास्क्, पीपीई किट, सॅनिटायझर, फेसमास्क शिल्ड, पल्स ऑक्सिमिटर, थर्मल गन, गोळ्या औषधी या बाबी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या जनजागृती व्हॅनच्या माध्यमातून ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना जनजागृती करण्यात येत आहे. तसेच 978 पोलिसांनी कोविड लसीकरणाचा दुसरा डोस घेतलेला आहे. पोलीस अधिकारी-कर्मचारी त्यांचे कुटुंबिय यांना कोरोना उपचारात कुठलीही अडचण येऊ नये या दृष्टीने एमजीएम रुग्णालयात 50 खाटा राखीव ठेवण्यात आलेल्या असून 3 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन मशीन कार्यालयामार्फत खरेदी करण्यात आले आहे. ते सध्या पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्या उपचाराकरिता एमजीएम रुग्णालयास देण्यात आले असल्याचे सांगून श्रीमती पाटील यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागाला कोरोनामुक्त करण्यासाठी इतर यंत्रणांच्या सहकार्याने पोलिसांमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती यावेळी दिली. तसेच 36 महिला बिट अंमलदार यांची प्रथमच जिल्हयात बिट अंमलदार म्हणुन नियुक्ती करण्यात आली असुन त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन त्या आता उत्तम रित्या गुन्हे तपास, ग्रामभेटी, आ.मृ. तपास, अर्ज चौकशी इ. फिल्डवरिल कर्तव्य सक्षमपणे पार पाडत असल्याचे सांगितले आहे.
यावेळी जिल्हा पोलीस दलातील सपोनि विश्वास रोहीदास पाटील, व सफौ जनार्धन बाबुराव मुरमे, यांनी सतत 15 वर्षे उत्तम सेवाभिलेख ठेवल्याबद्दल त्यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह देऊन राज्यमंत्री श्री.देसाई यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
No comments