Breaking News

राजर्षी शाहू महाराजांचे स्त्री विषयक कार्य हे योध्दा सुधारकाचे – इतिहास संशोधक डॉ. मंजुश्री पवार

Rajarshi Shahu Maharaj's work on women is the work of a warrior reformer - history researcher Dr. Manjushree Pawar

    नवी दिल्ली  : स्त्री शिक्षण, मुलींच्या लग्नाचे वय, विधवा विवाह तसेच आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह अशा सर्वच पातळीवर राजर्षी शाहू महाराजांनी केलेले कार्य हे योद्धा सुधारकाचे होते, असे प्रतिपादन इतिहास संशोधक डॉ मंजुश्री पवार यांनी केले.

    नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत डॉ. मंजुश्री पवार  “छत्रपती शाहू महाराजांचे स्त्री विषयक कार्य आणि सद्यस्थिती” या विषयावर ४१ वे पुष्प गुंफताना बोलत होत्या.

    यावेळी डॉ. मंजुश्री पवार म्हणाल्या, आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण ही फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांनी झाली. शाहु महाराजांचे वेगळेपण म्हणजे राजा असुनही त्यांनी आपल्या राज दंडाचा वापर प्रत्येक घटकाला उन्नत करण्यासाठी  केला. महात्मा फुलेंनी महाराष्ट्रात समतेची बीजे पेरली. त्यांनी शुद्रातिशुद्रांना, स्त्रीयांना गुलामीच्या आणि अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढण्याचे कार्य केले. महात्मा फुलेंची ही पंरपरा खंडीत न होता ती शाहू महाराजांच्या कार्यातून प्रवाहित होत राहिली. या कार्यात नवीन स्वातंत्र्य चळवळीचा प्रवाह येऊन मिसळलेला होता. ब्रिटीशांच्या मांडलिकत्वात राहून शाहू महाराजांनी केलेले कार्य हे संपूर्ण भारतात अभिनव असे होते. शाहू महाराजांच्या काळातही समाज सुधारक होते, त्यांनीही कार्य केले मात्र, हे कार्य समाजाच्या वरच्यास्तराच्या सुधारणेचे कार्य होते. ते कार्य आडव्या स्वरूपाचे (Horizontal ) असे होते.  तर शाहू महाराजांनी केलेले कार्य हे उभे (vertical ) असे सर्वस्तरांना स्पर्श करणारे होते.

    शाहू महाराजांनी दोन पातळ्यांवर स्त्री मुक्तीचे कार्य केले एक म्हणजे स्त्री शिक्षित व्हावी यासाठी प्रयत्न केले तर दुसरीकडे स्त्रियांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण व्हावे यासाठी त्यांनी केलेले कायदे. शाहू महाराजांनी जे स्त्री मुक्तीचे कार्य १९ व्या शतकाच्या सुरूवातीस केले ते २० व्या शतकातील स्त्री मुक्ती चळवळीचे प्रवेश व्दार आहे, असे डॉ. मंजुश्री पवार म्हणाल्या.

    शाहू महाराजांनी केलेले स्त्री मुक्तीचे कार्य हे जागतिक दर्जाचे होते, असे सांगुन डॉ. पवार म्हणाल्या, जागतिक पातळीवर जेंव्हा उदारमतवादी स्त्रीवाद, मार्क्सवादी स्त्रीवाद, जहालवादी स्त्रीवाद आणि समाजवादी स्त्रीवाद अशी मांडणी केली जात होती, त्यावेळी शाहू महाराजांचे स्त्री मुक्तीचे कार्य हे उदारमतवादी स्त्रीवादामध्ये बसणारे होते.

    भारतीयस्तरावर जर पाहिले तर तीन कालखंड पडतात यामध्ये पहिला कालखंड हा पुरूष सुधारकांनी स्त्रीदास्य विमोचनाचे केलेले कार्य,  दुसरा कालखंड स्त्री स्वातंत्र्यांचा कालखंड आणि तिसरा स्त्री जागृतीचा कालखंड आहे. शाहु महाराजांचे कार्य हे पहिल्या कालखंडात बसणारे असे आहे.

शिक्षणासाठी अनुदान..

    भारत स्वतंत्र्य होण्यापुर्वी भारतीय समाजात एक उतरंड  होती. त्यामध्ये उच्चवर्णीय हा इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र होऊ इच्छित होता मात्र, खालच्या वर्गातील लोकांना आपल्या अधिनस्थ ठेऊ इच्छित होता. तसेच येथील बहुजनवर्ग उच्चवर्णियांच्या गुलामीतुन मुक्त होण्याचा प्रयत्न करीत होता मात्र, आपल्या घरातील स्त्रियांना गुलाम ठेऊ इच्छित होता. ही उतरंड लक्षात घेऊन शाहू महाराजांनी स्त्रियांना शिक्षित करणे हा त्यांच्या कारभारातील एक महत्त्वाचा भाग मानला. शाहू महाराजांनी त्या काळात प्राथमिक शिक्षण सक्तीचा कायदा संस्थानात लागु केला होता. यासाठी त्यांनी आपल्या खजिन्यातील एक लाख रूपये खर्च केले होते ज्यामध्ये स्त्री शिक्षण अंतर्भुत होते. तत्कालीन ब्रिटीश सरकाराने मुंबई इलाख्यासाठी ज्यामध्ये सिंध, गुजरात, कर्नाटक मिळून जो भाग होता येथील लोकांच्या शिक्षणासाठी एक लाख रूपयाहून कमी खर्च करीत होते.

मुली-प्रौढ – महिलांसाठी अभिनव उपक्रम

     सन  १९१७ मध्ये कोल्हापुरात २४ शाळा आणि विद्यार्थ्यांची संख्या १२९६ इतकी होती. शाहू महराजांच्या कार्याच्या परिणाममुळे या १९२१ मध्ये २४ शाळांची संख्या वाढून ती ४२० इतकी झाली आणि २२ हजार विद्यार्थी शिक्षण घेऊ लागले. पुढे शाहू महाराजांनी शिक्षणासाठी असलेली एक लाखाची तरतूद वाढवून तीन लाख रूपये केली. यासर्वांचा सकारात्मक परिणाम स्त्री शिक्षणावर झालेला दिसून येतो. शाहू महाराजांनी केवळ शहरी भागातच नव्हे तर डोंगरी भागात, मागास भागात, ग्रामीण भागात मुलींच्‍या शाळा सुरू केल्या. त्या काळातील होणारे जातीभेद ओळखून जातीनिहाय मुला-मुलींसाठी शाळा सुरू केल्या. मुलींच्या शिक्षणात प्रगती व्हावी म्हणून त्यांनी अभिनव उपक्रम राबविले. त्यामध्ये  मुलींची शाळेची  संख्या वाढल्यावर शिक्षकांना बक्षिस देण्याची प्रथा त्यांनी सुरू केली होती. स्त्रियांच्या प्रौढ शिक्षणासाठीही शाहू महाराजांनी कार्य केल्याचे दिसते. सन १९१९ मध्ये शाहू महाराजांनी मागासवर्गीय स्त्रियांसाठी हूकूम काढून, ज्या प्रौढ स्त्रियांना शिक्षण घ्यायचे असेल त्यांची राहण्याची, खाण्याची, सर्व सोय राजवाड्यामार्फत मोफत केली होती, अशी माहिती डॉ. पवार यांनी यावेळी दिली.

    त्यांच्या कन्या अक्कासाहेब महाराज यांच्या विवाहाच्या वेळी कोल्हापूर सह देशभरातील हुशार मुलींसाठी शिष्यवृत्त्या सुरू केल्या होत्या. शाहु महाराजांनी मुलींच्या उच्चशिक्षणासाठीही प्रयत्न केल्याचे दिसते. कोल्हापूरमध्ये फिमेल ट्रेनिंग स्कुल होते, त्याच्या प्रमुख या युरोपिय महिला मिस लिटिल होत्या. त्या जेव्हा सेवानिवृत्त झाल्यावर रखमाबाई केळवकर या अंतत्य बुद्ध‍ीमान हुशार स्त्रिची नेमणूक केली. अल्बर्ट मेमोरियल संस्था काढून त्यातील स्त्रियांच्या स्वतंत्र विभाग काढून त्यांचे प्रमुख पद हे स्त्रिलाच दिले होते. रखमाबाई केळवकर यांची कन्या कृष्णाबाई केळवकर यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली, होती वैद्यकिय शिक्षणासाठी मुंबईच्या मेडीकल कॉलेज मध्ये पाठविले होते, पुढे या कृष्णाबाईंना वैद्यकिय उच्च शिक्षणासाठी इंग्लंडलाही पाठविले होते. अतरीकाबाई डॅनियल बेकर या इंग्रजी बाईलाही त्यांनी उच्च शिक्षणासाठी पुण्याला पाठविले होते. स्त्रियांनी केवळ प्राथमिक शिक्षणच घेऊ नये तर उच्च शिक्षणही घ्यावे हे त्यांचे धोरण होते.

स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न..

    स्त्रियांना सर्वांगांने कसे समृध्द करता येईल हा शाहूंचा विचार होता. त्यानुसार त्यांनी कार्यही केले. स्त्रियांच्या राजकीय सहभागही वाढला पाहिजे यासाठी १८९५ मध्ये जेव्हा राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रीय अधिवेशन होते, या सभेसाठी आपले प्रतिनिधी म्हणुन कृष्णाबाई केळवकर आणि व्दारकाबाई केळवकर या दोन महिलांना पाठविले होते.

    शाहू महाराजांचा स्त्री उद्धाराचा जो परीघ आहे तो त्यांची सुन राणी इंदूमती यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. राणी इंदूमती या वयाच्या ११ व्या वर्षी विधवा झाल्या होत्या. त्यावेळच्या सर्व रूढींना झुगारून त्यांची शिक्षणाची व्यवस्था सोनतळी येथे केली होती. राणी इंदुमतीमध्ये समतेचा संस्कार व्हावासाठी त्यांच्यासोबतीला महाराजांनी त्यावेळी वेगवेगळ्या जातीतील चार मुलींना सोबत ठेवले होते. इंदुमतीला केवळ पुस्तकी शिक्षण न देता चौफेर शिक्षण देण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केला होता. इंदुमतीला शाहू महाराजांनी पत्रे लिहिले होती, त्या पत्रात आपल्या सोबत असऱ्यांची काळजी घ्यावी, तसेच शिक्षणाचे महत्त्व सांगणारे असा संदेश त्यांनी दिला होता. इंदूमतींचे आयुष्य म्हणजे शाहु महाराजांची स्त्रीविषयक सुधारणा करण्याची प्रयोगशाळा होती. शाहू महाराजांनी स्त्री शिक्षणाची बीजे १९ व्या शतकाच्या सुरवातीस रोवली होती. त्यानुसार आज महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची दिशा अधिक प्रगत असायला हवी होती मात्र, आज इतक्या वर्षानंतरही तसे आश्वासक चित्र राज्यात विशेषत: ग्रामीण भागात  दिसत नाही याकडेही लक्ष वेधून हे चित्र बदलण्याचे प्रयत्न करने गरजेचे असल्याचे  आवाहन  डॉ. मंजुश्री पवार यांनी यावेळी केले.

स्त्रीमुक्तीसाठी कायदे…

    स्त्रीला जर पूर्ण स्वातंत्र्य देण्यासाठी स्त्रीदास्य विमोचनाचे कायदे करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन शाहू महाराजांनी ५ क्रांतीकारक कायदे केले होते. वर्ष १९१७ ला शाहु महाराजांनी  विधवा पुर्नविवाह कायदा केला, असे नमूद करून डॉ. पवार म्हणाल्या, १९०१ च्या खानेसुमारीनुसार  ब्राम्हण जातीतील ५ वर्षाखालच्या १५,५०० विधवा होत्या, तर १५ वर्षाखाली ३ लाख २५ हजार विधावा होत्या आणि २५ वर्षाखाली २५ लाख ४० हजार विधवा होत्या. ही दाहकता बघून शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानात विधवा पुर्नविवाहाचा कायदा केला होता. येवढे करूनच ते थांबले नाहीत तर त्यांनी त्यांची सुन इंदुमती पुढे ही पुर्नविवाहाचा प्रस्ताव ठेवला होता.

आतंरजातीय-आंतरधर्मीय विवाह कायदा हा शाहू महाराजांनी १२ जुलै १९१९ ला केला. त्यांनी आपल्या संस्थामध्ये मुलीच्या लग्नाचे वय १२ वरून १४ वर्ष केले होते, या कायदात एक कलम असेही होते, १८ वर्ष पुर्ण झाल्यानंतर लग्नासाठी मुलींना आपल्या पालकांची परवानगी घेण्याची गरज नाही. स्वतंत्र भारतात १९५५ ला असा कायदा करण्यात आला होता शाहू महाराजांचे कार्य हे किती काळाच्या पुढेच होते हे यावरून दिसते. याच काळात पटेल बील आले होते. ज्यामध्ये मुलीचे वय हे १२ वरून १४ करावे असे होते. तत्‍कालीन सनातनी व्यवस्थेने या बिलाला प्रखर विरोध दर्शविला होता. स्त्रीला माणुस म्हणुन जगण्याचा अधिकार देणारा कायदा शाहु महाराजांनी केला होता. त्यांनी केलेला घरगुती छळ प्रतिबंधक कायदा म्हणजे स्त्री उद्धाराकडून स्त्री मुक्तीकडे जाणारा हा कायदा होता. अशा स्वरूपाचा कायदा भारत सरकारने २००५ मध्ये सम्मत केला. जातपंचायतीकडे घटस्फोटासंदर्भातील अधिकार शाहू महारांजी काढून घेतला होता. नको असलेला जोडदारापासून काडीमोड करण्याचा कायदाही शाहू महाराजानी स्त्रियांसाठी केला होता. समाजातील स्त्री उतरंडीमध्ये सर्वात खालच्या वर्गात असणाऱ्या स्त्री देवदासी, जोगतीनी, मुरळी, भावीनी यांच्यासाठी १९२० मध्ये कायदा केला आणि जोगतीनी ही प्रथा बंद केली. शाहू महाराजांनी केलेले कार्य स्त्री उत्क्रांतीच्या द‍िशेने केलेले कार्य आहे, असे डॉ. पवार म्हणाल्या.

No comments