उद्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन ; किराणा, फळे, भाजीपाला, बेकरी, डेअरी,मिठाई, खाद्य पदार्थ दुकानें बंद राहतील
"ब्रेक द चेन" अंतर्गत 4 मे पासून 10 मे पर्यंत जिल्हादंडाधिकारी यांचे सुधारित आदेश जारी
सातारा दि. 3 (जिमाका) : सातारा जिल्हयात कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने सातारा जिल्हयातील सध्य स्थितीत लागू असलेले निर्बंध कडक करणे आवश्यक असल्याने प्र. जिल्हादंडाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये, दि. 04 मे 2021 रोजीचे 07.00 वाजलेपासून ते दि. 10/05/2021 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत खालील प्रमाणे आदेश जारी केले आहेत.
सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई इत्यादी सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी यांसह), पाळीव प्राण्यांच्या खाद्य पदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्याच्या उत्पादनाशी निगडीत दुकाने पुर्णपणे बंद राहतील. तथापि, या दुकानांची घरपोच सेवा सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 या कालावधीतच चालू ठेवण्यास परवानगी राहील.
कृषी अवजारे व शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 या कालावधीतच चालू राहतील. तथापि, सदर दुकानांची घरपोच सेवा सकाळी 7.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीतच चालू ठेवण्यास परवानगी राहील.
हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरील खादय पदार्थ विक्री दुकाने यांची घरपोच पार्सल सेवा दुपारी 12.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यतच सुरू राहतील. तसेच त्यासंबंधित इतर बाबींना दि. 14 एप्रिल 21 रोजीचे आदेश लागू राहतील.
घरपोच मद्य विक्री बाबत दि. 20/04/2021 रोजीच्या आदेशामध्ये नमूद कालावधीमध्ये दुपारी 12.00 ते सायंकाळी 05.00 असा बदल करणेत येत असून या आदेशातील इतर सर्व बाबी कायम राहतील.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही, आदेशात नमूद करण्यात आले आहे.
No comments