Breaking News

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदीस जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना मान्यता दयावी - खा.रणजितसिंह यांची मागणी

Zilla Parishad should approve Gram Panchayat for purchase of Oxygen Concentrator Machine - Demand of MP Ranjitsinh

    गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 7 मे 2021 -  बहुतांश ठिकाणी ग्रामपंचायतीमार्फत विलगिकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत,  मात्र रुग्णास ऑक्सिजनची गरज भासल्यास रुग्णांना देता येत नाही, त्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदीस जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना  मान्यता दयावी अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

    सातारा जिल्ह्यातील फलटण व इतर तालुक्यातील  ग्रामीण भागात  कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी ग्रामपंचायतीमार्फत विलगिकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत,  मात्र रुग्णास ऑक्सिजनची गरज भासल्यास किंवा संवेदनशील परिस्थितीत रुग्णास गावापासून शहरापर्यंत किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना, ऑक्सिजन अभावी रुग्ण वाटेतच दागावत आहेत. अशावेळी 15 व्या वित्त आयोगातून प्रत्येक ग्रामपंचायतीस ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर मशीन घेतल्यास, याचा फायदा रुग्णांना होईल, तरी  जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीस मशीन खरेदीस  मान्यता दयावी जेणेकरून रुग्णांचे प्राण वाचतील व तात्पुरत्या स्वरूपाची मदत, त्या त्या गावांमध्ये उपलब्ध होईल अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्राद्वारे केली.

     याबाबत भाजपचे  जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, भटक्या विमुक्त जमाती सेलचे अध्यक्ष सुनील जाधव, लतीफ तांबोळी, स्वीय सहाय्यक राजेश शिंदे यांचे शिष्टमंडळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांना  भेटून निवेदन दिले व यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी ही विनंती केली.

No comments