Breaking News

ओबीसी आरक्षणासाठी फलटण येथे 26 जून रोजी भाजपचे चक्काजाम आंदोलन

डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन करताना जयकुमार शिंदे, बजरंग गावडे, अभिजीत नाईक निंबाळकर, अमोल सस्ते,  राजेश शिंदे, बाळासाहेब काशिद,  नानासो इवरे,  राहुल शहा,  वसिमभाई मणेर, सौ. मुक्ती शहा, सौ. उषा राऊत व इतर 
Chakkajam Andolan on 26th June at Phaltan for OBC reservation

    फलटण ( गंधवार्ता वृत्तसेवा ) - सध्याच्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील ओबीसी वर्गाचे  रद्द झालेले राजकीय आरक्षण परत मिळवून देण्यासाठी भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहर व तालुका भारतीय जनता पार्टी शनिवार 26 जून रोजी सकाळी 11 वाजता क्रांतिसिंह नाना पाटील चौक फलटण येथे चक्काजाम आंदोलन करणार आहे.

    भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 68 व्या बलिदान दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या फलटण शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि विविध आघाडी व मोर्चाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस भाजपाचे सातारा जिल्हा  उपाध्यक्ष जयकुमार शिंदे,  फलटण तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, युवानेते अभिजीत नाईक निंबाळकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

    यावेळी जयकुमार शिंदे म्हणाले, सध्याचे सरकार नाकर्ते असून, गतवेळच्या भाजपा सरकारने घेतलेले चांगले निर्णय या सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाल्यामुळे, महाराष्ट्रातील सामान्य जनतेचे फार मोठे नुकसान झाले आहे. मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षण आणि धनगर आरक्षण  याबाबत राज्य सरकार दुटप्पीपणाची भूमिका घेत असून, आपल्या नाकर्तेपणाचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा प्रयत्न करीत आहे, तर केंद्राने केलेल्या चांगल्या कार्याचे श्रेय मात्र राज्य सरकार स्वतःकडे घेत आहे. कोरोना बाबतची लस कमी पडल्यास केंद्र सरकारच्या नावाने आरडाओरड केली जाते व त्याच केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करून दिल्यास, आम्ही लोकांना मोफत लस पुरवठा करून देऊ अशा प्रकारच्या वल्गना राज्य सरकारचे प्रतिनिधी करत असतात. हे सर्वसामान्य जनतेला माहीत असले तरीसुद्धा  कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्याची महती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे सांगून ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी  खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या वतीने फलटण येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकामध्ये 26 जून रोजी सकाळी अकरा वाजता चक्काजाम आंदोलन करणार असून यासाठी फलटण शहर व तालुक्यातील ओबीसी वर्गातील स्री पुरुषांनी उपस्थित राहावे असे सांगितले.

    तालुका अध्यक्ष पै. बजरंग गावडे यांनी चक्काजाम आंदोलनाची भूमिका व आंदोलन कशा पद्धतीने केले जाईल याची माहिती देऊन यापुढे भारतीय जनता पार्टी फलटण शहर व  तालुक्यात आक्रमक भूमिका घेऊन, कार्य करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असे सांगितले. 

    शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी आपल्या प्रास्ताविकात माजी सरसंघचालक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या कार्याची माहिती देऊन, तालुक्यातील विविध प्रश्नासंदर्भात चर्चा केली.

    यावेळी कामगार नेते बाळासाहेब काशीद, यांनीही आपले विचार मांडले. आभार युवा मोर्चाचे अध्यक्ष नानासो इवरे यांनी मानले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे राजेश शिंदे, राहुल शहा,  वसिमभाई मणेर, सागर अभंग सुनिल जाधव,  किरण राऊत, संतोष सावंत,  शशिकांत रणवरे, सोमनाथ एजगर , सुधीर जगदाळे , नितीन जगताप, तानाजी करळे, अल्पसंख्याक अध्यक्ष  रियाजभाई इनामदार, सौ. मुक्ती शहा, सौ. उषा राऊत, सौ. विजया कदम, सौ. ज्योती इंगवले, सौ. विमल भुजबळ उपस्थित होते.

No comments