मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई, दि. २६ :- सामाजिक न्यायाचे अग्रदूत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. तसेच राजर्षी शाहूंच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मुख्यमंत्री अभिवादनात म्हणतात, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समताधिष्ठित समाज व्यवस्थेचा आग्रह धरला. अनेक अनिष्ट चालीरीती-प्रथांना पायबंद घातला. शिक्षण, आरोग्य अशा सामान्यांच्या जीवनाशी निगडित क्षेत्रात दूरगामी अशी धोरणे राबविली. त्यांनी कृषी, सहकार, उद्योग या क्षेत्रांच्या विकासासाठी दूरदृष्टीने प्रकल्प, योजना राबविल्या. त्याद्वारेही सामाजिक अभिसरण होईल असे नियोजन केले. त्यांच्या या द्रष्ट्यापणाची फळे आज आपण चाखतो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील रयतेचे राज्य सत्यात उतरवण्यासाठी राजर्षी शाहूंनी परिश्रमपूर्वक प्रयत्न केले. ते सामाजिक न्यायाचे अग्रदूत आहेत. त्यांच्या या कार्याला कोटी कोटी प्रणाम. सर्वांना सामाजिक न्याय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
No comments