जिंती गावात कोरोनाचा वेग मंदावला; पण डेंग्यूचा वेग वाढला
जिंती गावातील गतारांची अवस्था अशी झाली आहे. |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २३ जून - फलटण तालुक्यातील जिंती गावामध्ये डेंग्यूचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून २० डेंग्यूचे रुग्ण सापडले असल्याने गावामध्ये खळबळ उडाली आहे.
जिंती गावामध्ये कोरोनाचे रुग्ण बऱ्यापैकी कमी झाल्यामुळे नागरिकांमधील कोरोनाची दहशतही काही प्रमाणात कमी झाली आहे. कोरोनाचा वेग मंदावला आहे ; पण आता डेंग्यू, मलेरियाची भीती वाढली आहे. जिंती येथे कर्मवीर चौक, लक्ष्मीनगर परिसरात डेंग्यू रुग्णाची वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
गावामध्ये कोरोनाचा संसर्ग आता बऱ्यापैकी कमी झाल्यामुळे, नागरिकांमधील कोरोनाची दहशत काही प्रमाणात कमी झाली आहे; पण पावसाळ्याला सुरुवात झाल्यामुळे आता मलेरिया, डेंग्यू आणि मेंदुज्वरासारख्या आजारांसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. ग्रामीण भागात पावसाळ्याला सुरुवात झाली की, ठिकठिकाणी पाणी साचून डासांची उत्पत्ती वाढते. त्यातून सर्वाधिक प्रमाणात डेंग्यू व इतर आजार पसरतात.
गावामध्ये डेंग्यू रुग्णांची एकुण संख्या 20 झाली आहे. सध्या खाजगी रुग्णालयात 5 रुग्ण उपचार घेत आहे. एक रुग्ण बारामती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. तालुका आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
या समस्येबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार केली. परंतु तुम्ही गावठाणात नसुन फॉरेस्ट मध्ये राहत असल्याने, तेथे काम करता येत नाही असे उत्तर ग्रामपंचती ने दिले. आम्ही फॉरेस्टमध्ये राहतो, आमच्याकडून कर वसुली केली जाते पण फॉरेस्टमधील नागरिकांना ग्रामपंचायती कडून उपाययोजना दिल्या जात नाहीत - संगिता वाघमारे (ग्रामस्थ, महिला)
No comments