राजधानी टॉवर बेकायदा बांधकाम ; नगरसेवकांचा मुख्यधिकारी यांच्या दालनात धरणे आंदोलन करण्याचा इशारा
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे निवेदन देताना विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, गटनेते अशोक जाधव, सचिन अहिवळे, डॉ. प्रविण आगवणे |
Illegal construction of Rajdhani Towers; Warning of corporators to Dharne Andolan in the office of the Chief Officer
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. २५ जून २०२१ - फलटण नगर पालिकेकडून नव्याने बांधण्यात आलेल्या राजधानी टॉवरमधील बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमण दोन दिवसात न हटवल्यास सोमवार, दिनांक २८ जून पासून सर्व विरोधी नगरसेवकांसह मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा विरोधी नगरसेवकांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी शेखर सिंहयांच्याकडे देण्यात आले आहे. याप्रसंगी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, गटनेते अशोक जाधव, सचिन अहिवळे, डॉ. प्रविण आगवणे उपस्थित होते.
फलटण नगर पालिकेकडून नव्याने बांधण्यात आलेल्या राजधानी टॉवरमधील बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमण बाबत आंदोलनाची नोटीस दिनांक १ जून रोजी आम्ही दिली होती. त्यावर मुख्याधिकाऱ्यांनी २० दिवसात संबंधित कार्यालयाची परवानगी न मिळाल्यास सत्वर कारवाई करु असे आश्वासन दिले होते. याबाबत दिनांक २१ जून रोजी मुख्याधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता सहाय्यक संचालक नगररचना, सातारा यांनी दिनांक १८ जून रोजीच्या पत्राने बांधकामास परवानगी दिली असल्याचे मुख्याधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तथापी, दिनांक २३ जून रोजी सहाय्यक संचालक, नगररचना, सातारा यांनी दिनांक १८ जून रोजी दिलेली परवानगी रद्द समजण्यात यावी असे पत्र मुख्याधिकाऱ्यांना व आम्हाला दिले आहे. त्यावरुन सदरचे बांधकाम हे बेकायदा असल्याचे सिद्ध होत असून येत्या दोन दिवसात ते न हटवल्यास सोमवार, दिनांक 28 जून पासून सर्व विरोधी नगरसेवक फलटण पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात बांधकाम काढले जात नाही तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलनास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
No comments