ऑक्सफॅम इंडिया यांच्या सहकार्याने गरजूंना दर्जेदार वैद्यकीय सुविधा देण्यास मोलाची मदत - तहसीलदार समीर यादव
Oxfam India and Krantisurya Pratishthan Phaltan donate medical equipment worth Rs. 13 lakhs to sub-district hospital
ऑक्सफॅम इंडिया आणि क्रांतिसूर्य प्रतिष्ठान, फलटण तर्फे उपजिल्हा रुग्णालयास १३ लाख रुपये किमतीची वैद्यकीय साधने
फलटण (प्रतिनिधी) - शासकीय रुग्णालयात प्रामुख्याने गोरगरीब जनताच वैद्यकीय उपचार घेत असल्याने येथे वैद्यकीय तपासणी व उपचाराची साधने दर्जेदार, अत्याधुनिक स्वरुपाची असली पाहिजेत, यासाठी ऑक्सफॅम इंडिया आणि क्रांतिसूर्य प्रतिष्ठान यांनी केलेले प्रयत्न, घेतलेली मेहनत आणि त्यातून फलटणच्या उप जिल्हा रुग्णालयास उपलब्ध झालेली सुमारे १३ लाख रुपये किंमतीची वैद्यकीय साधने निश्चित रुग्णांना दिलासा देणारी ठरतील असा विश्वास तहसीलदार समीर यादव यांनी व्यक्त केला आहे.
ऑक्सफॅम इंडिया आणि क्रांतिसूर्य प्रतिष्ठान, फलटण यांनी उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध अत्याधुनिक वैद्यकीय साधने, सुविधांची माहिती घेऊन कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोणती, वैद्यकीय साधने आवश्यक आहेत याबाबत रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करुन आतापर्यंत २/३ वेळा त्यापैकी काही साधने उपलब्ध करुन दिली आहेत. त्याच पद्धतीने तिसऱ्या टप्प्यात सुमारे १३ लाख रुपये किमतीची साधने उपलब्ध करुन देण्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरुन तहसीलदार समीर यादव बोलत होते.
ऑक्सफॅम इंडियाचे स्टेट कोर्डीनेटर परमेश्वर , किरण कदम आणि संतोष धुमाळ, क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद नेवसे, सचिव व नगराध्यक्षा सौ. निताताई मिलिंद नेवसे, उप जिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ. व्यंकट धवन, वैद्यकीय अधिकारी डॉ. अंशुमन धुमाळ विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
फलटण शहर व तालुक्यात कोरोना कालावधीत सुमारे ३० हजार रुग्ण दाखल होते त्यापैकी सुमारे ४ हजार रुग्णांवर उप जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून उपचार करण्यात आले. त्यांना वैद्यकीय सेवा, सुविधा उपलब्ध करुन देताना आवश्यक साधने, सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था पुढे आल्याचे नमूद करीत क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे माध्यमातून त्यामध्ये ऑक्सफॅम इंडियाचा मोठा सहभाग नोंदविल्याचे नमूद करीत तहसीलदार समीर यादव यांनी ऑक्सफॅम इंडिया, मिलिंद नेवसे, सौ. निताताई मिलिंद नेवसे व त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद दिले.
ऑक्सफॅम इंडिया या देश पातळीवर रुग्ण सेवेत आघाडीवर असलेल्या कंपनीशी फलटणकरांची ओळख मिलिंद नेवसे यांच्यामुळे झाल्यानंतर त्यांनी कोरोना कालावधीत उप जिल्हा रुग्णालयासाठी विविध वैद्यकीय साधने उपलब्ध करुन देतानाच येथील गरीब कुटुंबासाठी ग्रोसरी किट व अन्य वस्तूरुपाने केलेली मदत मोलाची असल्याचे नमूद करीत तहसीलदार समीर यादव यांनी ऑक्सफॅम इंडिया संस्थेचे आभार मानले.
कोरोना कालावधीत शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपाययोजना करताना क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून नागरिकांना औषधे, जीवनावश्यक वस्तू किट व अन्य मदत करताना ऑक्सफॅम इंडिया संस्थेने मोलाची मदत व सहकार्य केले, त्याबद्दल आपण प्रतिष्ठानची सचिव या नात्याने ऑक्सफॅम इंडिया संस्थेचे विशेषतः राज्य प्रभारी परमेश्वर पाटील व त्यांच्या सर्व सहकारी अधिकाऱ्यांना धन्यवाद न देता त्यांच्या ऋणात राहणे पसंत करु आगामी काळातही त्यांनी फलटणकरांना मदत व सहकार्य करावे अशी अपेक्षा सौ. निताताई मिलिंद नेवसे यांनी व्यक्त केली.
फलटण शहराची लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून शहरातील सर्वच घटकांच्या आरोग्याची जबाबदारी आपल्यावर निश्चित आहे, त्यामध्ये योगदान देताना महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहकाऱ्यांसमवेत गेल्या ५ वर्षात नगर परिषदेच्या माध्यमातून आपण गेली ५ वर्षे आरोग्यासह शहर वासीयांच्या अन्य समस्या सोडविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर नेवसे कुटुंबाचे गेल्या २ पिढ्यांचे या मातीशी असलेले ऋणानुबंध अधिक घट्ट करण्यासाठी आपण कुटुंबीयांच्या मदतीने सतत लोकोपयोगी उपक्रमात सहभागी होऊन लोकांच्या सुख दुःखात सहभागी झाल्याचे नगराध्यक्षा सौ. निताताई मिलिंद नेवसे यांनी स्पष्ट केले.
ऑक्सफॅम इंडिया संस्थेने संजीवनी मोहिमेंतर्गत क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्या विनंतीनुसार ४० लिटर क्षमतेचे १० ऑक्सिजन सिलेंडर, इक्सिजन फ्लोमीटर रेग्युलेटर १०, बायप्याप मशीन १, मल्टी पँरामीटर पेशंट मॉनिटर मशीन १, पल्स ऑक्सिमीटर २०, नेब्युलायझर मशीन २०, बि. पी. अप्रेटस मॅन्युअल/एलईडी ३, डीजीटल थर्मामीटर २०, ऑक्सिजन कॉंसंट्रेटर मशीन २, ऑक्सिजन नसल मास्क ६०, पीपीई किट १००, एन ९५ मास्क ५०, अल्कोहल बेस्ड सॅनिटायझर २०० मिली बॉटल ५०, हॅण्ड वॉश लिक्विड सोपं १७५ मिली बॉटल ५०, फेस शिल्ड २५ अशी एकूण सुमारे १३ लाख रुपये किमतीची वैद्यकीय साधने आजच्या कार्यक्रमात उप जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्याचे ऑक्सफॅम इंडिया प्रोजेक्ट डिरेक्टर व अवॉर्ड ऑर्गनायझर किरण कदम यांनी निदर्शनास आणून दिले.
प्रारंभी मिलिंद नेवसे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचा सत्कार केल्यानंतर प्रास्तविकात क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेत ऑक्सफॅम इंडिया संस्थेचे
मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. धवन यांनी ऑक्सफॅम इंडिया व क्रांतिसूर्य प्रतिष्ठानला धन्यवाद दिले.
प्रतिष्ठानचे संचालक सुनील नेवसे यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.
No comments