फलटणच्या प्रवीण जाधवची ऑलम्पिक साठी निवड ; देशासाठी पदक जिंकणे हेच माझे ध्येय - प्रवीण जाधव
Praveen Jadhav of Phaltan selected for Tokyo Olympics - My goal is to win a medal for the country - Praveen Jadhav
फलटण (प्रतिनिधी) - टोकियो, जपान येथे दि. २३ जुलै २०२१ पासून सुरु होत असणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये 'आर्चरी' (तिरंदाजी) या क्रीडा प्रकारासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात सरडे ता. फलटण गावचा सुपुत्र प्रविण रमेश जाधव याची निवड झाली आहे.
प्रविण जाधव हा मुळचा सरडे, ता. फलटणचा रहिवासी असून त्याचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. या शाळेतील त्याचे शिक्षक विकास भुजबळ यांनी त्याच्याकडील कौशल्य ओळखून त्याला खेळासाठी प्रवृत्त केले. त्यानंतर प्रविण अमरावती येथे 'आर्चरी' (धनुविद्या) चे प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल झाला.
नेमबाजीतील कौशल्यावर त्याची २०१५ साली आंतरराष्ट्रीय ज्युनिअर कँपसाठी निवड झाली. यातूनच पुढे सन २०१६ च्या आर्चरी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय वरिष्ठ संघात प्रविणला संधी मिळाली आणि आता टोकियो येथे होत असलेल्या जागतिक ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारतासाठी 'पदका'चा अचूक वेध घेण्यासाठी प्रविण सज्ज झाला आहे.
या यशाबद्दल प्रविण जाधव सांगतो, "मी आज जे काही आहे ते तिरंदाजीमुळे आहे. मी जर खेळाकडे वळालो नसतो तर कदाचित आज मी कुठेतरी मजूर म्हणून काम करत असतो. ऑलिंपिक स्पर्धेमध्ये देशासाठी पदक जिंकणे हेच माझे ध्येय आहे."
दरम्यान, प्रविण जाधवच्या निवडीबद्दल त्याला फलटण तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यातून ऑलिंपिक स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त होत असून त्याला क्रीडा क्षेत्राकडे प्रवृत्त करणारे जिल्हा परिषद प्रा. शिक्षक विकास भुजबळ व सौ. शुभांगी भुजबळ यांचेही अभिनंदन होत आहे.
No comments