Breaking News

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन यंत्रणा सज्ज - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

The administration is ready against the backdrop of the third wave - Shrimant Ramraje Naik Nimbalkar

     फलटण दि. १९ : कोरोना वाढता प्रादुर्भाव, संभाव्य तिसरी लाट, मागील दोन कोरोना लाटांमध्ये आलेल्या अडचणी यांचा विचार करुन सातारा जिल्ह्यातील संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी शासन/प्रशासन सज्ज असून आतापासूनच फलटणसह जिल्ह्यात विविध उपाय योजना करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

     फलटण येथील लक्ष्मी विलास पॅलेस या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी आ. दिपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, अनिल देसाई उपस्थित होते.

     फलटण शहरात  आतापार्यंत सुरु असणाऱ्या कोविड केअर सेंटरचे रुपांतर १५० बेडच्या जम्बो कोविड हॉस्पिटल मध्ये करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या असून लवकरच फलटण येथे जम्बो कोविड हॉस्पिटल सुरु होत आहे, तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना  धोका असल्याचे अंदाज तज्ञानी व्यक्त केल्याच्या पार्श्ववभूमीवर लहानमुलांसाठी फलटण येथे स्वतंत्र कोरोना उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी स्वतंत्र हॉस्पिटल उभे करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

      फलटण येथील उपजिल्हा रुग्णालय आणि लाईफ लाईन हॉस्पिटल येथे ऑक्सिजन प्लॅंट उभारण्याचे काम अंतीम टप्प्यात सुरु असून लवकरच ते पूर्णत्वास जाईल त्यावेळी ऑक्सिजनची टंचाई दूर करण्याच्या प्रयत्नांना यश येईल याची ग्वाही देत ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत, ह्या साठी  फलटण तालुक्यातील प्रत्येक प्रा. आरोग्य केंद्रासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नवीन, सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना उपचार तालुक्याच्या ठिकाणी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी उपाययोजना करण्याचे काम सुरु असल्याची माहिती यावेळी  श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

    कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी सर्वच यंत्रणा कार्यरत आहेत. आगामी काळामध्ये कोरोनाची तिसरी लाट तीव्र स्वरुपाची येऊ शकते असा अंदाज तज्ञ व्यक्त करीत आहेत. कोरोनाचा व्हायरस हा म्यूटेट होऊन तिसरी लाट तीव्र स्वरुपाची असेल असा अंदाज या तज्ञाकडून व्यक्त केला जात आहे. ह्या सर्व प्राश्वभूमीवर तालुक्याच्या ठिकाणी सर्वांना वेळेवर, योग्य उपचार मिळावेत यासाठी आपल्या सर्वांचे प्रयत्न असणार आहेत. तालुक्याच्या ठिकाणी यापूर्वीच्या दोन कोरोना लाटांमध्ये असलेल्या उपचार यंत्रणा पेक्षा अधिक सक्षम व अधिक बेड संख्येची यंत्रणा उभी करण्याचे काम सध्या सुरु असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

    सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे कोरोनाच्या कालावधीमधील कामकाज कौतुकास्पद आहे. सर्व यंत्रणांच्या सहाय्याने कोरोनावर मात करण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला आहे, करीत आहेत. जिल्ह्यातील सर्व आमदार व पदाधिकारी  जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या कोरोना लढाईस मदत करीत आहेत. कोरोनाच्या लढाईमधून जिल्हाधिकारी शेखर सिंह  इतर कामकाजही व्यवस्थित हाताळत असल्याचे मत ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

No comments