चैन स्नॅचिंग ; फरार आरोपीस सापळा लावून केले जेरबंद
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २० : चैन स्नॅचिंग प्रकरणात फरार असणाऱ्या सराईत आरोपीस फलटण शहर पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले आहे. सुरेश रमेश कदम वय २२ रा. ब्राम्हण गल्ली, फलटण मुळ रा. धुळदेव ता. फलटण असे संबंधित आरोपीचे नाव आहे. संबंधिताकडून ८४ हजार रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या बाबत फलटण शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ९ जून २०२१ रोजी सायंकाळी ७:४५ वाजण्याच्या सुमारास शहरातील गोळीबार मैदान परिसरातून एका महिलेच्या गळ्यातील २५ हजार रुपये किंमतीचे मिनी गंठण पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करित असताना, हा गुन्हा सराईत गुन्हेगार सुरेश रमेश कदम याने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. फरार असलेला सुरेश कदम हा दि. ७ जुलै रोजी फलटण शहरातील गजानन चौक येथे सायंकाळी येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्यास सापळा रचून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्यासह एकूण तीन अन्य गुन्हे साथीदारांसह केल्याची कबुली दिली आहे. तसेच त्याच्याकडून चोरी केलेला सोन्याचा मुद्देमाल, मोबाईल व मोटारसायकल असा एकूण ८४ हजार रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधिक्षक धिरज पाटील, पोलिस उपअधिक्षक तानाजी बरडे, फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भारत किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड, सचिन राऊळ, पोलिस उपनिरीक्षक अमोल कदम, पोलीस नाईक अशोक वाडकर, पोलीस नाईक नितीन भोसले, पोलीस नाईक शरद तांबे, पोलीस नाईक विक्रांत लावंड, पोलीस कॉन्स्टेबल दिग्विजय सांडगे, पोलीस कॉन्स्टेबल अच्युत जगताप यांनी केली.
No comments