Breaking News

कोकणसह पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आढावा घेऊन आर्थिक मदतीबाबत घोषणा करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Chief Minister Uddhav Thackeray will review the districts of Western Maharashtra including Konkan and announce financial assistance

आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जिल्ह्यात स्थानिक स्तरावर यंत्रणा उभारण्याचा निर्णय
तातडीची सर्व मदत पुरविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

    रत्नागिरी दि.  25 :- केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच नुकसानभरपाई संदर्भात मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना चिपळूण येथे सांगितले.  वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करून जिल्ह्याच्या स्तरावर याबाबत यंत्रणा उभारण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.   प्रश्न केवळ आर्थिक मदत पुरवणे असा नसून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभा करणे याला प्राथमिकता असेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

    मुख्यमंत्री आज चिपळूण दौऱ्यावर आले होते. त्यांनी चिपळूण शहरात व्यापारी तसेच नागरिकांशी संवाद साधला. आपल्या या भेटीदरम्यान त्यांनी बाजारपेठेत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यानंतर झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी प्रशासनाकडून झालेल्या आतापर्यंतच्या बचाव व मदत कार्य याबाबत माहिती जाणून घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

    यावेळी पालकमंत्री ॲङ अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार सर्वश्री भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, मुख्य सचिव सिताराम कुंटे, माजी मंत्री रविंद्र माने, विभागीय आयुक्त विलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ.बी.एन. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड आदी उपस्थित होते.

No comments