रुग्णवाहिकांच्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळतील - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते फलटण तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना नवीन रुग्णवाहिकांचे वितरण
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना नवीन रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळणार असून, या रुग्णवाहिकांमुळे निश्चित ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळणार असल्याचे विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
फलटण तालुक्यातील सर्व ६ प्रा. आरोग्य केंद्राकडील सध्याच्या रुग्णवाहिका जुन्या झाल्याने नवीन रुग्णवाहिकांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण करीत सर्व ६ प्रा. आरोग्य केंद्रांना टेम्पो ट्रॅव्हलर सुसज्ज, प्रशस्त रुग्णवाहिका महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभ पूर्वक वितरित करण्यात आल्या.
पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात आयोजित रुग्णवाहिका वितरण कार्यक्रमास आ. दिपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सभापती व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर खर्डेकर, उपसभापती सौ. रेखाताई खरात, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अनिल देसाई, जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रांत पोटे व त्यांचे सहकारी वैद्यकीय अधिकारी कर्मचारी, पंचायत समिती सर्व सदस्य, अन्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील प्रा. आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मिळावी ही मागणी गेले अनेक वर्षांची होती. सातारा जिल्ह्यातील प्रा. आरोग्य केंद्रांसाठी ३१ रुग्णवाहिका चौदाव्या वित्त आयोग निधीतून घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी ६ रुग्णवाहिका फलटण तालुक्यातील सर्व ६ प्रा. आरोग्य केंद्रांना उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
No comments