Breaking News

कोरोना प्रादुर्भावामुळे कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत; राज्यातील ४५ हजार विद्यार्थ्यांना होणार लाभ

Fee waivers for agricultural course students due to corona outbreak; 45,000 students in the state will benefit

    मुंबई, दि. 14 : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीवर चारही कृषी विद्यापीठांनी शासकीय व खासगी कृषी महाविद्यालयातील  पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत देण्याचा निर्णय कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज जाहीर केला. त्यामुळे राज्यातील ३८ शासकीय, १५१ विनाअनुदानित अशा एकूण १८९ महाविद्यालयातील ४५ हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्याचे आई-वडील, पालक यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल अशा विद्यार्थ्यांचे सुरू असलेले पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतच्या संपूर्ण शुल्कात सूट देण्याचा निर्णयही कृषिमंत्र्यांनी घेतला आहे.

    विद्यार्थ्यांकडे शुल्क थकित असेल तर सत्र नोंदणी आणि परीक्षेचा अर्ज करण्यास अडवू नये. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश कृषिमंत्र्यांनी यावेळी दिले.

    राज्यातील कृषी विद्यापीठांच्या अधिनस्त शासकीय व अशासकीय सर्व महाविद्यालयांचे सर्व पदवी, पदव्युत्तर व आचार्य या अभ्यासक्रमाचे विविध शुल्कामध्ये सवलत देण्याबाबत आज कृषिमंत्री  श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरूंची बैठक झाली.

या बैठकीत खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आले:

    अनुदानित महाविद्यालये व कृषी विद्यापीठ विभागातील सर्व अभ्यासक्रमांसाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कांमधील विद्यार्थी मदत निधी, विद्यार्थी सुरक्षा विमा शुल्क, वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शुल्क, महाविद्यालय नियतकालिक, अश्वमेध/क्रीडा महोत्सव शुल्क, विद्यार्थी वैद्यकीय तपासणी शुल्क, ओळखपत्र, विद्यार्थी सहायता / मदत / कल्याण निधी, स्नेहसंमेलन, गुण पत्रिका शुल्क, नोंदणी शुल्क, अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारचे खर्च करण्यात आलेला नाही, त्याबाबीसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात १०० टक्के सुट देण्याचा निर्णय घेण्यात आला.

    जिमखाना, खेळ व इतर उपक्रम आणि ग्रंथालय यांची देखभाल व ग्रंथालयामध्ये ई-कन्टेंट विकत घेण्यासाठी खर्च करण्यात आला असल्याने याबाबतच्या शुल्कामध्ये ५० टक्के सुट देण्यात यावी. विद्यार्थ्यांकडून वसतिगृहचा उपयोग करण्यात येत नसल्याने वसतिगृह शुल्कापोटी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात पूर्णपणे सूट देण्यात यावी.

    कायम विनाअनुदानित महाविद्यालयांनी आकारण्यात येणारे विकास शुल्क ( डेव्हलपमेंट फी) यामध्ये ५० टक्के सूट देण्यात यावी. विद्यार्थ्यांकडे मागील सत्रामध्ये प्रलंबित असलेले शुल्क ३ ते ४ हप्त्यात भरण्याची सवलत देण्यात यावी.

    यावेळी कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषि परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने, संचालक डॉ. हरिहर कौसडीकर चारही विद्यापीठांचे कुलगुरू अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील, दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत तसेच अधिष्ठाता समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक फरांदे  उपस्थित होते.

No comments